वसई : मागील काही वर्षात शहरात अनिर्बंध विकास कामे सुरू असून ती करताना पाणी निचरा होण्याचे कोणतेही नियोजन केले नसल्याने शहरातील जलकोंडी अधिक तीव्र झाली आहे. अवघ्या दोन दिवसात झालेल्या ४०० मिमी पावसातच शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना याचा मोठा फटका बसला.
शहरात जलकोंडी होण्याचे प्रमाण वाढले असून अवघ्या तीन ते चार तासात पडणाऱ्या पावसात शहरातील मुख्य रस्ते, सखल भाग पाण्याखाली जात आहेत. शहरात उभी राहत असलेली अनधिकृत बांधकामे, अनिर्बंध माती भराव, वाढती विकास कामे, पाणी जाण्याचे बंद झालेले नैसर्गिक मार्ग अशा विविध कारणांमुळे पावसाचा मोठा फटका वसई विरार शहराला बसू लागला आहे. २०१८ साली शहरात झालेल्या पूरस्थितीनंतर पालिकेने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी) आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी ) या सत्यशोधन समितीची नियुक्ती केली होती. त्या समितीने धारण तलावांची निर्मिती करणे, नैसर्गिक पाणी मार्ग सुरक्षित करणे आणि इतर सूचना केल्या होत्या. मात्र सात वर्ष उलटल्यानंतरही समितीच्या सूचनांची अंमलबजावणी पालिकेकडून करण्यात न आल्याने शहराला यावर्षी पुन्हा एकदा पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला आहे.
शहरात पावसाच्या पाण्याचा मुख्य निचरा नैसर्गिक नाले आणि खाडीमार्गे होत असतो. समुद्राच्या भरतीच्या वेळी पाण्याचा निचरा लवकर होत नाही तसेच गेल्या काही वर्षात खाडी मार्गात झालेली अतिक्रमणे, बेकायदा माती भराव ही कारणे सुद्धा पूरपरिस्थितीला जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग, पर्यावरण यांचे संरक्षण न झाल्यास भविष्यात पावसाळ्याच्या दिवसात शहरातील अनेक भाग पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पूरस्थितीत पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन सक्रिय
वसई विरार शहरात गृहसंकुले, मुख्य रस्ते, बैठ्या चाळी, पूर्व व पश्चिम पट्ट्यातील गावे अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पुराच्या पाण्यात विविध ठिकाणच्या भागात नागरिक अडकल्याच्या घटना समोर येत होत्या. यात भोयदापाडा, कामण, उमराळे, सारजा मोरी, भेंडीपाडा, राजावली यासह विविध ठिकाणांच्या भागातून दोन दिवसात ८२३ जणांची पालिकेच्या अग्निशमन दल व राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या मदतीने सुटका करण्यात आली. काही ठिकाणी पाण्याची पातळी अधिक असल्याने अग्निशमन दलाचे वाहन जात नव्हते तिथेही प्रयत्न करीत नागरिकांना बाहेर काढण्यात आले. तर काही ठिकाणी झाडे कोसळली होती ती सुद्धा हटविण्यात आली आहेत. पाणी उपसा पंप, जेवण व राहण्याची व्यवस्था यासह इतर प्रमुख सोयी सुविधा पालिकेकडून उपलब्ध करून दिल्या आहेत.
नालेसफाईचा दावा फोल
दरवर्षी वसई विरार शहरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. यासाठी कोट्यवधी रुपये निधी खर्च केला जातो. यावर्षीही पालिकेने ९५ टक्के नालेसफाई केल्याचा दावा केला होता. मात्र बहुतांश भागात नालेसफाई योग्य रित्या झाली नव्हती तर काही नाल्यात कांदळवन असल्याने तिथे नालेसफाईला अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे यावर्षी पालिकेने केलेला नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे.
प्रकल्पांच्या कामामुळे घरात पाणी ?
केंद्र सरकारचा बुलेट ट्रेन हा महत्वकांक्षी प्रकल्प वसई विरार शहरातून जात आहे. याशिवाय विरार -अलिबाग कॉरिडोर उभारणीचे काम ही सुरू आहे. प्रकल्पांच्या कामांचे नियोजन नसल्याने पाणी जाण्याच्या मार्गात अडसर निर्माण होऊन घरात पाणी शिरले असा आरोप नागरिकांनी केला आहे.