वसई:- आगामी महापालिकांच्या निवडणुका पार्श्वभूमीवर वसई विरार मध्ये राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. मंगळवारी शिवसेना (उबाठा) गटाचे माजी जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, तसेच बविआ नेते नितीन ठाकूर यांनी २ माजी नगरसेवकांसह भाजप मध्ये प्रवेश केला. सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली असून विविध पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना पक्षात खेचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
मंगळवारी प्रदेश कार्यालयात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट तसेच बहुजन विकास आघाडीच्या नेते आणि माजी नगरसेवकांनी भाजप मध्ये प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्यासह सोळा विभाग प्रमुखांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. पंकज देशमुख हे पूर्वी बहुजन विकास आघाडीमध्ये होते. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत दोन्ही जागा शिवसेनेच्या न सुटता काँग्रेसच्या वाट्याला गेल्या होत्या. त्यामुळे देशमुख यांच्या विरोधात वातावरण तयार झाले होते. पंकज देशमुख यांनी स्वतःहून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता
बहुजन विकास आघाडीला झटका
बहुजन विकास आघाडीचे दिग्गज नेते नितीन ठाकूर माजी नगरसेवक दिनेश भानुशाली यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केला. नितीन ठाकूर यांच्या पत्नी दिवंगत सुषमा ठाकूर बविआच्या पहिल्या बिनविरोध नगरसेविका होत्या. तसेच सलग तीन वेळा वसई पंचायत समितीच्या उपसभापती होत्या.नायगाव परिसरात नितीन ठाकूर यांचे वर्चस्व मानले जाते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे बविआला मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेनेत फूट
सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्निल बांदेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. मोठ्या प्रमाणावर नेते आणि कार्यकर्ते सोडून जात असल्याने शिवसेना ठाकरे गटापुढे आव्हान निर्माण झाले आहे.