विरार : वसई, विरार परिसराचे झपाटय़ाने होणारे शहरीकरण शेती व्यवसायाला मारक ठरत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे अधिकाधिक जमीन ही बांधकामाखाली जात असल्याने भात शेती लागवडीच्या क्षेत्रात घट होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेने यंदाच्या खरीप हंगामात ४०० हेक्टरहून अधिक लागवडी क्षेत्र कमी झाले आहे. यामुळे जमीन पडीक होऊन शहरीकरणाखाली जात असून शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे.
वसई, विरार परिसराचे झपाटय़ाने शहरीकरण होत असले तरी हजारो हेक्टर जमिनीवर आजही शेती केली जाते. त्यात प्रामुख्याने भातशेती, फुलशेती, भाजीपाला आणि फळांची शेती केली जात असून हजारो शेतकरी त्यावर उदरनिर्वाह करत आहेत. आता वाढत्या नागरीकरणामुळे भातशेतीमध्ये होणारी विकासकामे, वाढणारी महागाई, नैसर्गिक आपत्ती, शेत मशागत करताना येणाऱ्या विविध अडचणी व महत्त्वाचे म्हणजे शेत जमिनीमध्ये विकासकामासाठी केलेल्या भरावांमुळे सध्याच्या लागवडीतील शेतामधील पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यात शेतात मोबदला कमी मिळत असल्याने मजुरांची उणीव, पावसाची अनियमितता, वाढणारी महागाई यामुळे यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात शेती केलीच नाही. मात्र काही शेतकऱ्यांनी भात शेती कसण्याऐवजी बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने फुलशेती भाजीपाला आणि फळांच्या शेतीकडे कल वळवला आहे. यामुळे या पिकांच्या लागवडीत वाढ झाली आहे.
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षी खरीप हंगामात ८ हजार ६७४ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड झाली होती. मात्र चालू वर्षी केवळ ८ हजार २१९.२० क्षेत्र लागवडीखाली आले आहे. यामुळे दिवसेंदिवस लागवडीखालील क्षेत्र कमी होऊन शेती व्यवसाय हळूहळू कमी होत आहे.
शेतीबद्दल अनास्था, जमिनी विक्रीत मोठा पैसा
जमीन विक्री करून मोठय़ा प्रमाणात पैसा मिळत असल्याने आणि नव्या पिढीतील सदस्यांची शेती व्यवसायाबद्दलची असलेली अनास्था आहे. अनेक सदस्य नोकरी-धंद्यात गुंतल्याने जमिनी पडीक आहेत. त्यात महागाईमुळे शेतीचा खर्च परवडत नाही. खते, बियाणे, ट्रॅक्टर यांची भाववाढ झाली आहे. यामुळे अनेक शेतकरी आपल्या जमिनी निवासी संकुले, कारखाने, हॉटेल्स, रिसॉर्ट यासाठी विकत आहेत अथवा भागीदारीत गुंतत आहेत.