ग्राहकांसाठी उपाहारगृह सुरक्षित असल्याची ग्वाही

वसई : वसई-विरार शहरातील उपाहारगृहचालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण केले आहे. पालिकेकडून लस न मिळाल्याने उपाहारगृह चालकांनी सशुल्क शिबिरांतून लशी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे वसई-विरार शहरातील उपाहारगृह ग्राहकांसाठी करोनाच्या दृष्टिकोनातून सुरक्षित असल्याची ग्वाही उपाहारगृहचालकांनी दिली आहे.

करोनामुळे लागू झालेली टाळेबंदी शिथिल करताना राज्य शासनाने १५ ऑगस्टपासून राज्यातील उपाहारगृहांना रात्री १० पर्यंत खुले राहण्यास परवानगी दिली होती. मात्र ते करताना उपाहारगृहामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करोना प्रतिबंधक लशींच्या दोन्ही मात्रा घेणे अनिवार्य केले होते. सध्या वसई- विरार महापालिकेकडून करोना लशी मिळत नसून मोठी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे उपाहारगृहचालकांनी स्वखर्चाने लसीकरण शिबिरे आयोजित करून सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण केले आहे. आम्ही आमची संघटना आणि आमदार क्षितिज ठाकूर यांच्या सहकार्याने ९००हून अधिक कर्मचाऱ्यांना लशी दिल्या आहेत, अशी माहिती वसई-विरार उपाहारगृह संघटनेचे सचिव नागराज शेट्टी यांनी दिली. यामुळे आमच्या हॉटेल्सच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याने उपाहारगृह ग्राहकांसाठी सुरक्षित असल्याचे ते म्हणाले. सध्या श्रावण महिना असल्याने उपाहारगृहमध्ये ग्राहकांचा हवा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. मात्र पुढील महिन्यात सकारात्मक चित्र दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.