महिन्याभरात २०.४ टक्क्यांची वाढ; दुसऱ्या मात्रेचे लसीकरण १३ टक्के

विरार : मागील सहा ते सात महिन्यांपासून थंडावलेल्या लसीकरण मोहिमेला सप्टेंबर महिन्यात चांगलीच गती मिळाली आहे. पालिकेच्या लसीकरणात अवघ्या महिन्याभरातच २०.४ टक्क्यांनी वाढ होऊन ४१.५ टक्के इतके लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे पालिकेच्या लसीकरणात दुपटीने वाढ झाली आहे.

पालिकेने जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात केली होती. मात्र सुरुवातीला पालिकेला शासनाकडून लससाठा कमी प्रमाणात दिला जात होता. त्यामुळे शहरात वारंवार लसटंचाई

निर्माण होत होती. तर दुसरीकडे लस मिळविण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत असल्याने मोठय़ा प्रमाणात गोंधळ निर्माण होत होता.

मात्र सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच पालिकेच्या लसीकरणाला मोठी गती मिळाली आहे. शहरात पालिकेकडून मोठमोठे मेगा लसीकरण महोत्सव घेतले जाऊन लागल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे. 

मागील महिन्यापर्यंत पालिकेने शहरातील २१.५ टक्के इतक्या नागरिकांचे लसीकरण केले होते. मात्र अवघ्या २३ दिवसांत पालिकेच्या लसीकरणाची आकडेवारी ही ४१.५ टक्क्यांवर गेली आहे. म्हणजेच पालिकेच्या लसीकरणामध्ये २०.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आतापर्यंत पालिकेच्या क्षेत्रातील एकूण ८ लाख ३४ हजार ४०० इतक्या जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यात ६ लाख ३९ हजार ८०६ जणांना पहिली मात्रा देण्यात आली असून पहिल्या मात्रेचे २८.६ टक्के इतके लसीकरण झाले आहे. तर २ लाख ९० हजार २३४ जणांना लशीची दुसरी मात्रा देण्यात आले असून दुसऱ्या मात्रेचे १३ टक्के इतके लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

हळूहळू पालिकेला मिळणाऱ्या लससाठय़ातही वाढ होत असल्याने पालिकेचे लसीकरण हे चांगल्या गतीने सुरू झाले आहे. त्यामुळे पालिकेच्या लसीकरणाची आकडेवारी ही ४१.५ टक्क्यांवर गेली असून लवकरच उर्वरित नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले जाणार असल्याचा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे. आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचारी आणि नंतर सरकारने सुरू केलेल्या विविध वयोगटांतील व्यक्तींचे लसीकरण पालिकेकडून करण्यात आले.