वसई: वसई, विरार शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांच्या विरोधात वाहतूक विभागाने कारवाईची मोहीम आखली आहे. वर्षभरात जवळपास १८ हजार ९०४  रिक्षांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. शहराच्या वाढत्या नागरीकरणासोबतच रिक्षांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. २०१७ पासून परवाने खुले झाल्याने मोठय़ा संख्येने रिक्षा रस्त्यावर धावू लागल्या आहेत.

मात्र तरीही शहरात अनधिकृतपणे व नियमबाह्य पद्धतीने रिक्षा चालविल्या जात आहेत. तर दुसरीकडे काही रिक्षाचालक हे वाहतूक नियमांचे पालन न करताच रिक्षा चालवीत आहेत. यामध्ये विनापरवाना, विनाबॅच, अतिरिक्त प्रवाशांची वाहतूक, अतिरिक्त भाडे आकारणी, प्रवाशांसोबत गैरवर्तन, कालबाह्य झालेल्या रिक्षा चालविणे असे प्रकार सर्रासपणे घडतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी वसईच्या वाहतूक विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत वर्षभरात वसई १८ हजार ९०४ रिक्षांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून ६३ लाख ३६ हजार ८०० रुपये दंड आकारण्यात आला असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवैध प्रवासी वाहतूक सुरूच

रिक्षात परिवहनच्या नियमानुसार केवळ तीन प्रवासी बसविण्यास परवानगी आहे. मात्र वसई विरार शहरातील विविध ठिकाणी तीनपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक केली जाते. रिक्षांच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी रिक्षात बसविले जात असल्याने अपघात होण्याचा धोका आहे. यासाठी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.