सुहास बिऱ्हाडे
वसई: वसई आणि भाईंदरला जोडणाऱ्या खाडीपुलाच्या कामाच्या अनेक परवानग्या अद्याप मिळालेल्या नसल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे. हा पूल २०२४ रोजी पूर्ण होणे अपेक्षित असताना आता पुलाचे काम अनिश्चित काळासाठी पुढे गेले आहे. या अतिविलंबामुळे सुरुवातीला ३०० कोटींच्या या पुलाची किंमत २ हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे.
वसई-विरार शहराला मुंबईशी जोडणाऱ्या भाईंदर खाडीवर एमएमआरडीएतर्फे सहापदरी पूल बांधला जाणार आहे. २०१३ मध्ये या कामाला अंतिम मंजुरी मिळाली होती. हा पूल कांदळवन वनक्षेत्र आणि खारभूमीच्या मिठागरातून जाणार आहे. या कामासाठी एमएमआरडीएने मुंबई सागरी मंडळह्ण (एमएमबी), इनलँड वॉटरवेज अथॉरिटी ऑफ इंडियाह्ण (आयडब्ल्यूएआय) आणि महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए) च्या परवानग्या मिळवाव्या लागणार होत्या. मागील वर्षी खारभूमी विभागानेदेखील ९.८६ हेक्टर जागा देण्यास संमती दर्शवली होती. त्या जागेच्या मोबदल्यात एमएमआरडीए खारभूमी विभागाला ३२ कोटी ४३ लाख रुपये देणार असल्याचे मंजूर केले होते. यानंतर निविदा काढून पुलाच्या कामाला सुरुवात केली जाणार होती.
परंतु प्रत्यक्षात पुलाच्या कामाच्या अनेक परवानग्या मिळाल्याच नसल्याचे खुद्द एमएमआरडीएच्या एका पत्रावरून उघड झाले आहे. या पुलाच्या कामाला विलंब का होत आहे याबाबत आप पक्षाचे सहसचिव जॉय फरगोय यांनी एमएमआरडीएकडे विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना एमएमआरडीएने एक पत्र पाठवले आहे. त्यात या पुलाच्या कामासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ तसेच महाराष्ट्र सागरी नियंत्रण क्षेत्र प्राधिकरणाच्या परवानग्या मिळालेल्या नाहीत तसेच मिठागर आणि वन विभागाच्या परवानग्यादेखील मिळालेल्या नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या परवागन्या मिळविण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू असून सर्व अनिवार्य परवानग्या मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती मुख्य अभियंता प्र.जि. भांगरे यांनी पाठवलेल्या पत्रात दिली आहे. ही माहिती अतिरिक्त महानगर आयुक्त यांच्या मान्यतेने देण्यात आल्याचेही म्हटले आहे.
खर्च ३०० वरून २००० कोटींवर जाण्याची शक्यता
या पुलाचे काम सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. २००० साली नवघर माणिकपूर नगर परिषद असताना या खाडीपुलाचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे ठेवण्यात आला होता. तेव्हा पुलाचा खर्च ३०० कोटी होता. २०१८ पर्यंत तो अकराशे कोटींवर पोहोचला होता. अखेर २०१३ मध्ये एमएमआरडीएने या पुलाच्या कामाला मंजुरी दिली होती. त्यामुळे पुलाचा खर्च आता १५०० कोटींवर पोहोचला होता. सप्टेंबर २०१४ पर्यंतचे लक्ष्य गृहीत धरून हे नियोजन करण्यात आले होते. मात्र आता पुलाचे काम आणखी लांबणीवर पडल्याने खर्च २००० कोटींवर जाण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Apr 2022 रोजी प्रकाशित
भाईंदर खाडीपुलाच्या कामाची ‘रखडपट्टी’;अनेक परवानग्या मिळाल्या नसल्याची ‘एमएमआरडीए’ची माहिती
वसई आणि भाईंदरला जोडणाऱ्या खाडीपुलाच्या कामाच्या अनेक परवानग्या अद्याप मिळालेल्या नसल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे. हा पूल २०२४ रोजी पूर्ण होणे अपेक्षित असताना आता पुलाचे काम अनिश्चित काळासाठी पुढे गेले आहे.
Written by सुहास बिऱ्हाडे

First published on: 23-04-2022 at 02:45 IST
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai bhayander creek bridge work mmrda reports permits obtained amy