उकाडय़ाने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा

वसई : तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या पावसानंतर वसई-विरारमध्ये जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी पूर्वमोसमी पावसात रस्ते जलमय झाले आहेत,  तर उन्हाच्या उकाडय़ामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रादेशिक हवामान खात्याने १ ते ३ जूनदरम्यान पालघर जिल्ह्यत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली होती. अखेर वसई तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून मंगळवारी  संध्याकाळपासून शहरी तसेच ग्रामीण भागात वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली होती. तर काही ठिकाणी विजेचा कडकडाट सुरू असल्याचे पाहायला मिळाले. काही भागांत पावसाचा जोर अधिक असल्याने अवघ्या तासाभरातच  शहरी तसेच ग्रामीण भागातील रस्ते जलमय झाले.  अचानक आलेल्या  या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. वाऱ्याचा वेगही अधिक असल्याने शहरी व ग्रामीण भागातील वीजपुरवठाही खंडित झाला होता, तर बुधवारी सकाळच्या सुमारासही काही ठिकाणी पावसाची रिमझिम सुरूच होती.

विरार फलाटावर  गोंधळ

वसई : विरार रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर बुधवारी सकाळी विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन आग लागली. या आगीमुळे धूर निघत असल्याने वेळ प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. मात्र पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच आग विझवून दुरुस्ती केली. रात्री पडलेल्या पावसामुळे केबलमध्ये पाणी शिरून शॉर्ट सर्किट झाले आणि आग लागली होती, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र यात कुणीही जखमी झाले नाही वा कुठल्याही प्रकारची वित्तहानी झाली नाही.