वसई येथे आरती यादव नामक २२ वर्षीय तरूणीला भर रस्त्यात लोखंडी पान्याने मारहाण करत तिची हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आरोपने अतिशय निर्घृण पद्धतीने सर्वांसमोर आरती यादवची हत्या केली. आता यानंतर तिच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आरतीच्या कुटुंबियांनी स्थानिक पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलत असताना मृत आरतीच्या वडिलांनी या घटनेची पार्श्वभूमी सांगितली. “आम्ही आरती आणि रोहितच्या लग्नाला विरोध केला होता. रोहितने स्वतःची खोली केली तरच लग्नाला परवानगी देऊ, असे आम्ही बजावले होते. पण तो आपली ऐपत नसल्याचे सांगायचा. त्यामुळे तू तुझं बघ, आम्ही आमच्या मुलीचं बघू, असे सांगून आम्ही संबंध तोडले होते. मात्र आठ दिवसांपूर्वीच तो आमच्या घराजवळ येऊन राडा करत होता. तेव्हा आम्ही पोलिसांत जाऊन तक्रार केली. पण पोलिसांनी तक्रार न घेता सर्वांना समजावून पाठवून दिले”, असे आरतीच्या वडि‍लांनी सांगितले.

“गृहमंत्री महोदय राजीनामा द्या, सोडा खुर्ची…”, वसईत तरुणीची भररस्त्यात हत्या, किरण माने संताप व्यक्त करत म्हणाले…

वृत्तवाहिनीशी बोलत असताना आरतीच्या आईने तर टाहोच फोडला. माझ्या मुलीचा जीव घेणाऱ्याला फाशीची शिक्षाच देण्यात यावी, अशी मागणी तिच्या आईने केली. तसेच आरतीची बहीण सानियानेही वृत्तवाहिनीशी संवाद साधला. “आम्ही पोलीस ठाण्यात रोहितच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी आमच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही. त्यांनी रोहितकडून पैसे घेऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. तसेच काल माझ्या बहिणीची हत्या होत असताना लोकांमधून कुणीही पुढे आले नाही. सर्वजण पाहत बसले. जर कुणी पुढे येऊन माझ्या बहिणीला वाचविले असते तर आम्ही त्यांचे धन्यवाद मानले असते”, अशी संतप्त भावना आरतीच्या बहिणीने व्यक्त केली.

“पोलिसांचा आणि कायद्याचा धाक आहे का?” प्रसिद्ध दिग्दर्शकाची वसई हत्या प्रकरणाबाबत संतापजनक पोस्ट, म्हणाले, “मुर्दाड बघ्यांचं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसईत काय घडलं?

नालासोपारा येथे राहणारा रोहित यादव (२९) आणि आरती यादव (२२) या दोघांचे मागील सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र आरती अन्य मुलाशी बोलत असल्याचा रोहित याला संशय होता. यावरून त्या दोघांमध्ये भांडणे होत होती. त्यामुळे रोहित संतप्त झाला होता. आरती वसईच्या एका कंपनीत कामाला लागली होती .मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली होती. मात्र गावराई पाडा येथील स्टेट बँकेत समोर रोहितने तिला अडवले. दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी रोहित ने आपल्या सोबत आणलेल्या लोखंडी पान्याने तिच्यावर सपासप वार केले. आरती खाली कोसळली. काही वेळाने रोहित पुन्हा आला आणि त्याने तिच्यावर वार केले. यावेळी प्रत्यक्षदर्शींपैकी कुणीही पुढे आले नाही. सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये बघ्याची गर्दी आजूबाजूला दिसत आहे.