वसई : कोळीबांधवांसाठी अत्यंत महत्वाचा असलेला नारळीपौर्णिमेचा सण शुक्रवारी वसई विरार मधील समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समुद्रकिनाऱ्यावर नारळीपौर्णिमेनिमित्ताने मिरवणूका काढून दर्या राजाला भक्ती भावाने नारळ अर्पण करण्यात आला. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे समुद्रातील मासेमारी बंद असते.  मच्छीमार बांधव नारळीपौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून समुद्राला शांत होण्याची विनंती करून मासेमारीच्या हंगामाला सुरुवात करतो. 

शुक्रवारी वसई विरार मधील समुद्र किनारी आगरी कोळी बांधवांनी नारळीपौर्णिमा सण धुमधडाक्यात साजरा केला आहे. दर्या राजाला नारळ अर्पण करण्यासाठी वसईतील अर्नाळा, वसई नायगाव, पाचूबंदर, रानगाव यासह विविध ठिकाणच्या समुद्र किनाऱ्यावर कोळी बांधवांनी मोठी गर्दी केली होती.

पारंपारिक पेहरावात, बेंजो, ढोलताशांच्या ठेक्यावर ‘ सण आयलाय गो’ नारळी पुनवचा ‘ या गाण्यासह विविध गाण्यांच्या तालावर ठेका धरत मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.यात लहान मुले – मुली ही पारंपारिक पेहराव घालून नृत्य सादर केले. यावेळी मानाच्या नारळाची विधिवत पूजा करून यंदाचा मासेमारीचा हंगामात चांगला जाऊदे व कोळी बांधवांवरील सर्व संकटे सरून आनंदाचे दिवस येऊदे अशी प्रार्थना दर्या राजाला भक्ती भावाने मानाचे नारळ अर्पण करण्यात आले.

नारळ फोडीची स्पर्धा रंगली

नारळी पौर्णिमेनिमित्त वसईत अनेक ठिकाणी नारळ फोडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा म्हणजे पारंपरिक उत्सवाचा एक भाग असून स्पर्धकांची नारळ जिंकण्यासाठी चुरस पहायला मिळाली. या स्पर्धेत बाजी मारण्यासाठी खास विशेष प्रजातीचे नारळ ही वापरण्यात आले. यात टणक कवच असलेल्या गरुडी नारळ ही वापरले जातात असे रमाकांत कोळी यांनी सांगितले.

किनाऱ्यावर गर्दी

नारळी पौर्णिमेच्या सणाच्या निमित्ताने हा उत्सव पाहण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर विविध भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. तर दुसरीकडे कोळी बांधवांच्या पारंपारिक पेहेरावात फोटोशूट करण्यासाठी सुद्धा गर्दी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.