वसई : शुक्रवारी साजऱ्या केल्या जाणाऱ्या नारळी पौर्णिमेचा सणाची लगबग कोळीवाड्यात सुरू झाली आहे. हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी कोळी बांधव सज्ज झाले आहेत. वसईच्या भागात मोठ्या संख्येने आगरी- कोळी बांधव राहत आहे. नारळीपौर्णिमा हा या बांधवांचा सर्वात महत्वाचा सण. या दिवशी महिला व पुरुष आपल्या पारंपरिक पेहरावात दर्या राजाला मानाचा नारळ अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येतात.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण केल्यावर मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरवात करण्याची प्रथा आहे. त्यामुळे कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना व जाळ्यात चांगले मासे मिळू दे अशी प्रार्थना करतात.
शुक्रवारी वसईच्या नायगाव, पाचूबंदर, अर्नाळा या समुद्र किनाऱ्यावर हा सण मोठ्या जल्लोष साजरा केला जाणार आहे. मागील आठवडा भरापासूनच त्याची तयारी कोळी बांधवांनी सुरू केली आहे. या दिवशी पारंपारिक वेश परिधान करून बँड तालावर ठेका धरला जाणार आहे. तर समुद्र किनारी विविध गायन व नृत्य स्पर्धा, मानाचे सजावट केलेले नारळ व विविध कलाकृती सादर करण्यासाठी कोळी बांधव सज्ज झाले आहेत.
मासेमारीच्या हंगमापूर्वी दर्याला नारळ अर्पण
१ ऑगस्ट किंवा १५ ऑगस्ट तसेच नारळी पौर्णिमेनंतर कोळी बांधवांना मासेमारीचे परवाने दिले जातात. त्याचा परवाना नुकताच कोळी बांधवांना मिळाला आहे. या मासेमारीला जाण्या पूर्वीच अर्नाळा येथील कोळी महिलांनी दर्या राजाला मानाचा नारळ अर्पण केला आहे. यावेळी त्यांनी बँडच्या तालावर ठेका धरत आनंद साजरा केला आहे.
नारळ फोडीच्या स्पर्धा रंगणार
नारळी पौर्णिमेनिमित्त वसईत अनेक ठिकाणी नारळ फोडी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. ही स्पर्धा म्हणजे पारंपरिक उत्सवाचा एक भाग असते. ही स्पर्धा प्रसिद्ध असून यात स्पर्धक किती नारळ जिंकतात याची चुरस पाहायला मिळते. यावर्षी सुद्धा कोळीवाड्यात नारळ फोडी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. नायगांव कोळीवाड्यात श्रीवाल्मिकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ मंडळींच्या वतीने नायगांव कोळीवाड्यात शुक्रवारी नारळ फोडी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
पारंपरिक उत्सवाचा भाग असलेल्या या स्पर्धेमुळे कोळीवाड्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे.