वसई : वसई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले असून या पार्श्वभूमीवर सोमवारी आरक्षण सोडतीची रंगीत तालीम महापालिका मुख्यालयात घेण्यात आली.राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे.

विरार पश्चिम येथील महापालिकेच्या मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी सकाळी ११ वाजता ही सोडत पार पडणार आहे. त्यानंतर, येत्या १७ नोव्हेंबर रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात येईल. तर, १७ ते २४ नोव्हेंबर पर्यंत आरक्षण प्रारुपावर हरकती व सूचना सादर करता येतील. दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

वसई – विरार महापालिकेत २९ प्रभाग असून ११५ सदस्य संख्या आहे. यापैकी ३१ जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग (ओबीसी) करिता राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती ( एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) या प्रवर्गासाठी प्रत्येकी पाच जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. ७४ जागा या सर्वसाधारण प्रवर्गाकरिता राखीव राहणार असून ११५ पैकी ५८ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिली आहे.

अशी होणार सोडत

महापालिका मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावर आज सकाळी ११ वाजता प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

जिल्हापरिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या हस्ते या आरक्षण सोडती काढण्यात येणार आहेत.

पारदर्शक पद्धतीने पडावी यासाठी शहरातील नागरिकांना सोडतीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तर, केबलच्या माध्यमातून या कार्यक्रमांचे थेट प्रसारण केले जाणार आहे.