वसई : नालासोपारा पूर्वेच्या आचोळे तलाव परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या अंध वृद्धाचा तलावात बुडून मृत्यू झाला. भरतकुमार मेस्त्री (७०) असे या वृद्धाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. मेस्त्री हे मुलीला भेटण्यासाठी नालासोपाऱ्यात आले होते. आचोळे तलावाला संरक्षक जाळी नसल्याने मेस्त्री यांचा मृत्यू झाला. पालिकेच्या या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त होत आहे.

भरतकुमार मेस्त्री (७०) हे दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. ते मुंबईत रहातात. त्यांची विवाहित मुलगी नालासोपारा पूर्वेच्या भागात आचोळे गावात राहते. मेस्त्री नुकतेच मुलीला भेटण्यासाठी तिच्या घरी आले होते. दृष्टीहीन असले तरी ते काठीच्या आधारे नियमितपणे फेरफटका मारण्यासाठी आचोळे तलाव परीसरात जात होते.

मंगळवारी सकाळच्या सुद्धा नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी ते गेले होते. यावेळी ते काही काळ तलाव परिसरात जाऊन बसले होते. मात्र त्यानंतर तेथून ते घरी जायला निघाले. या तलावाला संरक्षण जाळी होती. पण ती तुटली होती. त्यामुळे अंदाज न आल्याने मेस्त्री थेट पाण्यात पडले. या घटनेची माहिती आजूबाजूच्या नागरिकांना मिळताच त्यांनी याची पोलीसांना दिली. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला आहे. याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आचोळे तलावाची दयनीय अवस्था झाली असून त्याठिकाणी सुरक्षा जाळ्याही तुटलेल्या आहेत. याकडे पालिकेने वेळीच लक्ष दिले नसल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.