वसई : नालासोपारा शहरात अल्पवयीन मुलीवंर लैंगिक अत्याचार करणार्या दोन विकृतांपैकी एका आरोपीला गुन्हे शाखा ३ च्या पथकाने उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून अटक केली आहे. त्यांची माहिती देणार्यास पोलिसांनी बक्षिस जाहीर केले होते. विकृतांच्या या कृत्यामुळे पालक धास्तावले होते. नालासोपारा शहरात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्या विकृतांची दहशत पसरली होती. त्यापैकी ९ ऑक्टोबर आणि १५ नोव्हेंबर रोजी दोन वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोन्ही आरोपीची छायाचित्रे पोलिसांनी प्रसिध्द करून त्यांची माहिती देणार्यास बक्षिसही जाहीर करण्यात आले होते. या दोन्ही विकृत आरोपींच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांच्या पथकांसह गुन्हे शाखेची ३ पथके स्वतंत्रपणे तपास करत होती.
हेही वाचा : वसई विरार महापालिकेतील २७ आयुर्वेदीक डॉक्टर झाले कायम
यातील एक आरोपी उत्तर प्रदेश मध्ये असल्याची माहिती गुन्हे शाखा ३ च्या पथकाला मिळाली होती. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या (एसटीएफ) मदतीने वाराणसी येथील केंट रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. विशाल कनोजिया असे या आरोपीचे नाव आहे. तो नालोसापारा येथील राहणारा असून संगणाकाचे सुटे भाग विक्रीचा व्यवसाय करतो. १५ नोव्हेंबर रोजी नालासोपारा येथील ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून पळून गेला होता. आरोपी कनोजिया याला रविवारी सुट्टीच्या न्यायालयात हजर करून सोमवारी वसईत आणले जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी दिली.पोलिसांकडून दुसऱ्या विकृत आरोपीचा शोध सुरू आहे.