लोकसत्ता प्रतिनिधी

वसई: वसई पूर्वेच्या सातीवली मौर्या नाका परिसरात नाला तुंबून गेल्याने त्याचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. यामुळे येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या दुर्गंधीच्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

वसई पूर्वेच्या भागात सातीवली परिसर आहे. सातीवली हा भाग लघुउद्योग आणि कामगार वस्ती म्हणून ओळखला जातो. येथे सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी पूर्वी ग्रामपंचायतीने आणि नंतर महापालिकेने गटारांची व्यवस्था केलेली आहे. मात्र, सातीवली मौर्या नाका जवळ नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाल्यामुळे आतील सांडपाणी अक्षरशः रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या रस्त्यावर अनेक कारखाने आणि घरे असल्यामुळे दिवस-रात्र लोकांची आणि वाहनांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर वाहणे, हे शहराच्या दयनीय अवस्थेचे चित्र स्पष्ट करते. नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, आजूबाजूच्या परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पालिकेने गटारांची नियमित स्वच्छता करावी आणि सांडपाणी वाहून जाण्याचे मार्ग मोकळे करावेत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. मात्र, पालिकेकडून याकडे दुर्लक्ष केले जात असून, हा प्रश्न तसाच राहिला आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

याठिकाणी स्वच्छतेचा अभाव असून, सतत नाला तुंबत असल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहते. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीतही महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे युवासेना ( ठाकरे गट) वसीम खान यांनी सांगितले आहे.
पालिकेने या समस्येची तातडीने दखल घेऊन परिसरातील नाला तुंबणार नाहीत आणि सांडपाणी रस्त्यावरून वाहणार नाही, यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वसीम खान यांनी पालिकेकडे केली आहे.

घाण पाणी प्रवाशांच्या अंगावर

पालिकेच्या संबंधित विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना केल्या जातात. मात्र, नाला तुंबण्याची समस्या कायमची झाली आहे. या मार्गावरून नागरिकांची आणि वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर आल्यास वाहनांच्या चाकांमधून नागरिकांच्या अंगावर घाण पाणी उडते अशी तक्रार ही नागरिकांनी केली आहे.

सातीवली भागात त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या स्वच्छता निरीक्षकाला सांगून पाहणी करून घेतली जाईल. त्यानंतर त्यावर पुढील उपाययोजना निश्चित केल्या जातील. -निलेश म्हात्रे, सहायक आयुक्त, प्रभाग समिती जी