वसई : वसईतील महत्वाचे प्रशासकीय केंद्र असलेल्या वसई तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहांची दुरावस्था झाली आहे. तुटलेले दरवाजे, साचलेला कचरा आणि बंद पडलेला फ्लश अशा विविध सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना मोठ्या असुविधेचा सामना करावा लागत आहे. तसेच अपंगासाठी असणाऱ्या स्वच्छतागृहाची अवस्थाही बिकट झाली आहे.

वसई पश्चिमेकडील वसई तहसील कार्यालय हे शहरातील नागरिकांना प्रशासकीय सेवा पुरविणारे महत्वाचे केंद्र आहे. त्यामुळे उत्पन्न दाखला, अधिवास दाखला, जातीचा दाखला अशा विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी अर्ज करण्याकरिता, तसेच सरकारकडून विद्यार्थी, महिला, वृद्ध, अपंग, यांच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनसंबंधित कामांसाठी दरारोज कितीतरी नागरिक वसई तहसील कार्यालयात ये-जा करत असतात. अनेकदा आपले काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांना बराच वेळ तहसील कार्यालयातच थांबावे लागते. यासाठी सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी कार्यालयात महिला, पुरुष तसेच अपंगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मात्र गेल्या काही काळात डागडुजीच्या अभावी या स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या पुरुष व महिला स्वच्छतागृहांच्या आवारात प्रवेश करताच कचरा साचल्याचे, तसेच विविध उपकरणे ठेवून जागा अडवल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांना या अस्वछतेतून आणि अडचणीतून वाट काढत जावे लागते. पुरुष आणि महिला स्वच्छतागृहांपैकी महिला स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय दयनीय असल्याचे दिसून येत आहे.

महिला स्वच्छता गृहांचे लाकडी दरवाजे खालच्या बाजूने तुटले आहेत. तसेच या दरवाजाच्या कड्याही पूर्णपणे गंजल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्याचप्रमाणे स्वच्छतागृहात बसवण्यात आलेले फ्लशसुद्धा पूर्णतः निकामी झाले असून स्वच्छतागृहाच्या भिंतींनाही बऱ्याच ठिकाणी तडे गेले आहेत. पुरुष स्वच्छतागृहाचीही परिस्थिती काहीशी अशीच असल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे, कार्यालयाच्या आवारात अपंगांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाचीही दुरवस्था झाली आहे. त्याचा दरवाजा गंजल्यामुळे तो नेहमी उघडा असतो, ज्यामुळे अपंग व्यक्तींना त्याचा वापर करणे कठीण झाले आहे. याशिवाय, इतर व्यक्तींकडूनही या स्वच्छतागृहाचा सर्रास वापर केला जात असल्याने अपंगांसाठी उपलब्ध असलेली ही सुविधा केवळ नावापुरतीच उरली आहे.

कार्यालयाच्या भिंतींना पानाच्या पिचकाऱ्यांची रंगोटी वसई कार्यालयाच्या भिंतींवर विविध ठिकाणी ठळक अक्षरात परवानगीशिवाय पोस्टर लावू नये असे लिहिलेले दिसून येते. पण बरोबर याच सूचनांवर अनेकांनी पानाच्या पिचकाऱ्यांचा मारा केल्याचे दिसून येते. तसेच कार्यालयाच्या पायऱ्यांलगत,आवारात इतर ठिकाणीही पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगरंगोटी केल्याचे चित्र आहे. त्यामुळे कार्यालयातील या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत वसई तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार राजाराम देवकाते यांच्याशी संपर्क साधला असता, या स्वच्छतागृहांसंबंधित अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवून त्यांची दुरुस्ती केली जाईल. तसेच कार्यालयाच्या आवारात अस्वच्छता पसरावणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.