वसई / पालघर : मागील आठवडाभरापासून विविध तांत्रिक अडचणींमुळे वसई भाईंदर रोरो सेवा सुरू होण्यास विलंब झाला होता. आता यातून मार्ग काढत महाराष्ट्र सागरी मंडळाकडून मंगळवारपासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या “प्रायोगिक तत्त्वावर” रो-रो प्रवासी सेवा दिली जाणार आहे. वसई भाईंदर या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई- भाईंदर दरम्यान रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या मार्फत चालविली जाणार असून जान्हवी या फेरीबोटीची क्षमता ३३ वाहने व १०० प्रवाशी अशी असणार आहे. या बोटीला केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून परवानगी मिळालेली असून जेटीची सर्व कामे महाराष्ट्र सागरी मंडळाने केली आहेत. ही सेवा १३ फेब्रुवारी पासून सुरू केली जाणार होती. त्यानंतर १६ फेब्रुवारी पासून करण्याचे निश्चित केले होते. मात्र ऐनवेळी निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे सलग दोन वेळा याचे उदघाटन रद्द करावे लागले होते.

आता महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत वसई खाडीमध्ये वसई ते भाईंदर दरम्यान सध्या “प्रायोगिक तत्त्वावर” रो-रो प्रवासी फेरीबोट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा मंगळवार दि २० फेब्रुवारी पासून सुरू केली जाणार आहे. फेरीबोटीचे सुरक्षित व सुलभ नौकानयन, जेट्टी व बोटीमधून प्रवासी आणि वाहनांची सुलभ चढ-उतार आणि सुयोग्य नौकानयन मार्ग या सर्व बाबींची खात्री झाल्यानंतर, ह्या फेरीबोट सेवेचा लोकार्पण सोहळा औपचारिकरित्या करण्यात येणार आहे असे सागरी मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की, पोलीस ठाण्यात तक्रार

फेरीबोट सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरु होणार असली तरी, वाहतूक कोंडीचा सामना करत वसई ते भाईंदर असा रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांची वेळ व इंधनाची बचत करणारा, प्रदूषणमुक्त, पर्यावरणस्नेही व आरामदायी असा जलवाहतूक सेवेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जनतेसाठी ही सेवा नक्कीच दिलासादायक ठरेल असा विश्वास महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी व्यक्त केला आहे.

१) असे असतील प्रायोगिक तत्वावरील बोटींचे तिकीट दर

मोटारसायकल (चालकासह) – ६० रुपये
रिकामी तीन चाकी रिक्षा मिनीडोर (चालकासह) – १०० रुपये
चारचाकी वाहन (कार) (चालकासह)- १८० रुपये
मासे, पक्षी, कोंबडी, फळे इ. (प्रति टोपली)
व कुत्रा, शेळी, मेंढी (प्रति नग) – ४० रुपये
प्रवासी प्रौढ (१२ वर्षांवरील) – ३० रुपये
प्रवासी लहान (३ ते १२ वर्षांपर्यंत)- १५ रुपये

२) प्रवाशांना दिलासा

सध्या वसई भाईंदर या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकल गर्दी, महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रोरो सेवा सुरू झाली तर येथील प्रवाशांना अवघ्या काही मिनिटातच फेरीबोटीने वसई भाईंदर असा प्रवास करता येणार आहे. अखेर प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा :मीरा भाईंदर महापालिकेचा २ हजार २९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर; कुठलीही करवाढ नाही, नागरिकांना दिलासा

३) अशी असेल फेरीबोटीची वेळ

दररोज ही फेरीबोटी सकाळी पावणे सात ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत दिली जाणार आहे. भरतीच्या वेळी कमी अंतराच्या पूर्वी निश्चित केलेल्या ०.८ सागरी मैल अंतर असलेल्या मार्गाचा वापर होणार असल्याने प्रवास वेळ कमी लागणार आहे. तर ओहोटीच्या वेळेला सुमारे दोन सागरी मैल अंतराचा मार्ग लागेल असे महाराष्ट्र सागरी मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

Story img Loader