वसई : वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन विभागाकडून पुरवली जाणारी बससेवेची दुरवस्था झाली आहे. तुटलेले हॅन्डल, लोंबकळणारे दरवाजे आणि गादी नसलेल्या आसनांमुळे महानगरपालिकेच्या अनेक बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत, ज्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

वसई विरार शहरात पालिकेच्या परिवहन विभागाकडून बससेवा पुरवली जाते. सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात ११४ बसेस असून ३६ मार्गावर ही सेवा दिली जात आहे. दररोज या बसेस मधून ६० ते ६५ हजार प्रवासी प्रवास करतात. मागच्या काही महिन्यात ४० ई- बस परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. मात्र, यापैकी अनेक बसेस अजूनही जुन्या आहेत. यात तुटलेले हॅन्डल, लोंबकळणारे दरवाजे तसेच गाद्या नसलेली आसने यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. सुसज्ज बससेवा कधी मिळणार असा सवाल आता नागरिक करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासकरून सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी हा प्रवास अधिकच धोकादायक होत चालला आहे. बसमध्ये आधारासाठी वापरण्यात येणारी हॅंडल्स तुटलेली असल्यामुळे प्रवासी कोणत्याही आधाराशिवाय अधांतरी प्रवास करतात. अशावेळी तोल जाऊन पडण्याच्या घटना घडल्या आहेत. गर्दीच्या वेळी ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास अधिक अडचणीचा ठरत आहे. तात्पुरता उपाय म्हणून काही बसमध्ये तुटलेले हँडल्स आणि दरवाजे दोरीने बांधल्याचेही दिसून येत आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.