वसई:- देशभरात मतचोरी प्रकरण गाजत असतानाच वसईत ही मतदार यादीत गोंधळ असल्याचे प्रकार समोर येत आहेत. वसई विरार मधील एकाच मतदारांची नावे अनेक ठिकाणी असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. याबाबत जिल्हाधिकार्यांनी दुबार नावे शोधून ती यादीतून वगळण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्यावर्षी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. मात्र या निवडणुकीच्या वेळी वसई विरार मधील मतदारसंघात अनेक मतदारांची नावेच गायब असल्याचे दिसून आले होते. निवडणुकीत अनेक मतदार याद्यामध्ये पूर्वीपासून मतदान करीत आलेल्या मतदारांची नावेच गायब होती. तर दुसरीकडे एकाच व्यक्तीचे नाव अनेक मतदार यादीत नोंदले गेल्याचे प्रकार समोर आले होते. विशेषतः नालासोपारा मतदार संघात असा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. त्यावेळी विविध पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांनी यावर आक्षेप नोंदविला होता. आता काँग्रेसने केलेल्या मतचोरीच्या आरोपानंतर पुन्हा एकदा मतदार याद्यांमधील गोंधळ समोर येऊ लागला आहे.
एकाच व्यक्तीचे नाव ६३ ठिकाणी ?
नालासोपारा विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये सुषमा गुप्ता या एकाच महिलेचे ६ वेळा नाव असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही महिला या पत्त्यावर राहातच नसल्याचे आढळून आले आहे. यामुळे बहुजन विकास आघाडीने सत्ताधारी भाजपावर जोरदार टिका केली आहे. वसई विरारमध्ये एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नावे असल्याचा आरोप बविआने केला आहे. वसई विरारमध्ये पूजा सिंग या महिलेचे नाव ६३ वेळा, अभिषेक सिंग नावाच्या व्यक्तीचे नाव ४७ वेळा तर सुनील यादव याचे नाव ५३ वेळा आले असल्याचा आरोप बविआचे नेते माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी गुरुवारी केला.
प्रत्यक्ष नोंदणी करतात त्यांची नावे यादीत येत नाहीत मात्र ऑनलाइन नोंदणी करतात त्यांची नावे लगेच कशी येतात ? असा सवाल ठाकूर यांनी केला. इतकी नावे मतदार यादीत आली कुठून ? असा प्रश्न हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित करीत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला आहे. अशा याद्यांची पडताळणी होणे आवश्यक आहे. अशी नावे यादीत कशी नोंदली गेली याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी ही ठाकूर यांनी केली आहे.
जिल्हा निवडणूक विभागाच्या सूचना
मतदार यादीत दुबार असणारी नावे वगळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी लक्षपूर्वक कारवाई करावी तसेच नव्याने मतदार नोंदणी होताना दुबार नावाची नोंदणी होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी दिल्या आहेत. निवडणूक कामांमध्ये कसूर करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याबाबतच्या सूचना त्यांनी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील दुबार मतदार शोधण्याचे काम हाती घेण्यात आले असून दुबार नाव असणाऱ्या मतदारांनी नमुना अर्ज ७ भरून आपले मतदार यादीतील नाव एकाच ठिकाणी ठेवण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक विभागातर्फे करण्यात आले आहे.