भाईंदर:- उत्तन येथील कारखान्यातून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे तिवरांच्या झाडांचा मृत्यू होत असून, त्यामुळे कांदळवनाचा संपूर्ण परिसर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
उत्तन येथे परशुराम पुलाजवळ रस्त्याच्या एका बाजूला खाडी किनाऱ्याचा परिसर आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर कांदळवन आहे. या खाडीत काही लहान नैसर्गिक नाले येऊन मिळतात, ज्यामुळे परिसरातील पाण्याची नैसर्गिक विल्हेवाट होते. मात्र, या नाल्यांमध्ये कारखान्यातून सोडले जाणारे रासायनिक पाणी मिसळले जात असल्याचे समोर आले आहे.
सतत पाण्याच्या रंगात होणाऱ्या बदलांमुळे हे पाणी कपड्यांच्या कारखान्यातून येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या रासायनिक पाण्यामुळे तिवरांची झाडे सुकून मरणपंथाला जात आहेत. त्यामुळे कांदळवन नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. यामुळे स्थानिक पर्यावरणप्रेमी प्रचंड संतप्त झाले आहेत. अशा प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.तर या संदर्भात स्थळ पाहणी करून स्पष्टीकरण देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया अप्पर तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली आहे.
तक्रारींकडे दुर्लक्ष
उत्तन येथील कांदळवन क्षेत्रात रासायनिक पाणी सोडले जात असल्यामुळे तिवरांच्या झाडांचा मृत्यू होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वन विभागाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. मात्र, त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे पुन्हा खाडीत रासायनिक पाणी सोडले जात असल्याचे स्थानिक माजी नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी सांगितले.