वसई: वसई विरार शहरात गेल्या काही दिवसात दोनदा गटारावरील स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. शहरातील बहुतांश ठिकाणी गटारावरील स्लॅब आता जीर्ण झाले असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शहरातील धोकादायक गटारावरील स्लॅबचे तातडीने लेखापरीक्षण करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

वसई विरार महापालिकेकडून सांडपाणी निचरा होण्यासाठी गटारे तयार करण्यात आली आहेत. काही ठिकाणी गटारातील दुर्गंधीचा त्रास नागरिकांना होऊ नये म्हणून या गटारांवर महापालिकेकडून काँक्रिटचे स्लॅब टाकण्यात आले आहे. गेल्या महिन्यात वसईच्या तहसील कार्यलया जवळील तसेच कृष्णा टाऊनशिप येथील गटारावरील स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. यानंतर शहरातील धोकादायक स्लॅबचा मुद्दा चर्चेत आला आहे.

शहरातील बहुतांश भागात गटारांवरील स्लॅब जीर्ण अवस्थेत आहेत तर काही ठिकाणी गटारावरच अतिक्रमण केल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक ठिकाणी गटारांवरून नागरिकांची वर्दळ सुरू असते. अशावेळी दुर्घटना घडू नये यासाठी शहरात असलेल्या गटारावरील स्लॅबचे लेखापरीक्षण करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वसई भाजपाचे अध्यक्ष महेश सरवणकर यांनी महापालिका आयुक्तांकडे कृष्णा टाऊनशिप येथील गटारावरील स्लॅब कोसळण्याच्या घटनेची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या गटाराचे लेखापरीक्षण आवश्यक असून त्यावर पालिकेने कारवाई करावी अशी मागणी माजी सभापती वृन्देश पाटील यांनीही बहुजन विकास आघाडीच्या वतीने केली आहे.

पालिकेकडून दुरुस्तीच्या सूचना

शहरात धोकादायक स्थितीतील गटारांवरील स्लॅब तसेच काही ठिकाणी झाकणे नसल्याच्या तक्रारी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पालिकेकडून तपासणी करण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी गटारांची झाकणे उघडी आहेत त्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना करण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.