वसई: करोना काळात वसई विरार महानगरपालिकेकडून नागरिकांच्या सोयीसाठी शहरात ठिकठिकाणी हात स्वच्छता केंद्र (हँडवॉश) उभारणी करण्यात आली होती. मात्र या केंद्राकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याने सद्यस्थितीत ही केंद्र धूळखात पडून आहेत.
करोना काळात वसई विरार महापालिकेकडून नागरिकांची गरज लक्षात घेत शहरात १७ ठिकाणी हात स्वच्छता केंद्र उभारण्यात आले होते. यासाठी महापालिकेने ५९ लाख ५० हजार रुपयांचा खर्च केला होता. पण, करोना काळानंतर देखभालीच्या अभावी या केंद्रांची अवस्था फारच बिकट बनली आहे. विविध भागातील केंद्रात फरश्या फुटल्या आहेत. तर बहुतांश केंद्रातील नळ देखील चोरीला गेले आहेत. तर स्वच्छतेअभावी धूळ, चिखल यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर काही ठिकाणी कचरा आणि नको असलेले अन्नपदार्थ लोक इथे सर्रास फेकून देत असल्याचेही दिसून आले आहे.
ही केंद्र रेल्वे स्थानक, मुख्य रस्ते अशा वर्दळीच्या ठिकाणी असल्यामुळे रस्त्यावर वावरणारे गर्दुल्ले, भिकारी आता इथे आपलं बस्तान मांडू लागले आहेत. रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्याही या ठिकाणी ते बसून असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे वसई स्थानकाजवळील केंद्राचा फेरीवाल्यांकडून वापर चक्क फळं भाज्या ठेवण्याच्या गोदामाप्रमाणे केला जात आहे. त्यामुळे लाखों रुपये खर्चून उभारलेल्या या सार्वजनिक सुविधांचा असा गैरवापर आणि दुरवस्था चिंताजनक आहे. महापालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन यावर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.