वसई: रेबीज हा एक प्राणघातक आजार मानला जातो. हा आजार संक्रमित प्राण्यांच्या लाळेतून चावण्याद्वारे किंवा ओरखडे यांच्या संपर्कातून पसरतो आणि वेळीच उपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. वसई विरारमध्ये ही गेल्या काही काळात भटक्या श्वनांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. पण,  या श्वानांचे लसीकरण न झाल्यामुळे रेबीजचा धोका बळावला आहे. त्यामुळे आता वसई विरार शहरात रेबीजचा संसर्ग रोखण्यासाठी रेबीजमुक्त वसई विरार ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

वसई विरार शहरात भटक्या श्वानांच्या संख्येत मागील काही वर्षात कमालीची वाढ झाली आहे. यामुळे शहरातील रस्ते, खाजगी तसेच शासकीय आस्थापने, बस स्थानक, रेल्वे स्थानक, शाळा महाविद्यालयांचे आवार, बाजारपेठा अशा विविध ठिकाणी मोठ्या संख्येने श्वानांचे टोळके आढळून येतात. यामुळे वाहनांच्या पाठलाग करणे, रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर धावून जाणे, रहदारीच्या रस्त्यावर पादचाऱ्यावर विनाकारण भुंकणे अशा घटनांमुळे श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

तर यामुळे अनेक नागरिक रेबीज सारख्या संसर्गजन्य आजाराला बळी पडू लागले आहेत. संथ निर्बीजीकरण प्रक्रिया, सुविधांचा अभाव, आणि पालिकेकडून झालेले दुर्लक्ष यामुळे शहरातील श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. तर यावर पालिकेने ठोस उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

त्यामुळे रेबीज आजाराशी लढण्यासाठी आणि २०३० पर्यंत त्याचे पूर्णपणे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवून राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, दिल्ली यांनी रेबीज निर्मुलनासाठी राष्ट्रीय कृती योजनेची (NAPRE)  संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेअंतर्गत देशात नियमितपणे श्वानांचे लसीकरण करून आणि संसर्गानंतर उपचारांद्वारे रेबीज हळूहळू कमी करून तो पूर्णपणे नष्ट करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे.

याच पार्श्वभूमीवर, वसई विरार महानगरपालिका आणि पशुसंवर्धन विभाग, वसई तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात भटक्या श्वानांसाठी मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात हाती घेण्यात आली आहे. प्राण्यांची काळजी, आहार आणि कल्याण यामध्ये सहभागी असलेल्यांनी तसेच स्वयंसेवक, सामुदायिक कार्यकर्त्यांनी, निवासी गृहसंकुलात ज्यांना त्यांच्या श्वानांचे लसीकरण करायचे आहे, त्यांनी ‘रेबीजमुक्त वसई-विरार’ मोहिमेसाठी सहकार्य करावे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

रेबीजविरोधी मोहिमेत ‘असे’ व्हा सामील

रेबीजमुक्त वसई विरार मोहिमेसाठी महापालिकेकडून समाजमाध्यमांवर एक क्यू आर कोड जारी करण्यात आला आहे. हा क्यू आर कोड स्कॅन करून प्राप्त होणारा अर्ज नागरिकांना भरायचा आहे. भरलेल्या अर्जामधील तपशील संबंधित स्वयंसेवी संस्थांना पाठविण्यात येतील व संस्थेमार्फत भटक्या श्वानांच्या लसीकरणासाठी अर्जदारास संपर्क साधण्यात येईल. तसेच या संबंधी अधिक माहिती हवी असल्यास ९८३४१७७२६६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.​