वसई : वसई विरार महापालिकेचे वादग्रस्त तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्याविरोधात आता लाच लुचपत प्रतिबंधक विभागानेही गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या कारवाईत ८ कोटी रोख रक्कम आणि २३ कोटींचे सोने आढळले होते. या बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारत प्रकरणात वसई विरार महापालिकेचे तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांचा सहभाग आढळला होता. सक्तवसुली संचलनालयाने भूमाफियांसह रेड्डी यांच्या हैद्राबाद येथील घरावर ईडीने छापेमारी केली होती. या छाप्यात रेड्डी यांच्याकडे बेहिशोबी ८ कोटी २३ लाखांची रोकड आणि २३.२५ कोटींची दागिने असे ३१ कोटींचे घबाड सापडले होते. या प्रकरणी प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉंड्रींग कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला होता. रेड्डी यांनी गैरमार्गाने ही अपसंपदा गोळा केली असल्याचे तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाच्या तक्रारी वरून आचोळे पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १३(१) ब सह १३ (२) प्रमाणे अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेड्डीचा १० रुपये प्रतिचौरस फूट दर
वाय एस रेड्डी यांनी नगररचना विभागात कार्यरत असताना वसई विरार शहरात बेकायदेशीर मार्गाने बांधकाम व्यावसायिकांना परवानग्या दिल्या आहेत. यासाठी त्यांच्या कडून प्रति चौरस फुटांमागे १० रुपये इतका दर निश्चित केला होता. यातून रेड्डी यांनी कोट्यावधी रुपयांची माया जमवली होती. अखेर ईडीने कारवाई करीत हा घोटाळा उघड केला आहे.