वसई : वसई विरार शहरात प्रथमच मीटर रिक्षा प्रवासाला शनिवार पासून सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत रिक्षा चालक व प्रवासी यांच्यात जनजागृती करून हळूहळू ही सेवा पूर्वपदावर येणार आहे. या मीटर रिक्षांच्या सेवेमुळे प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणीला चाप लागेल व प्रवाशांना ही इच्छित स्थळी जाण्यास मोठी मदत होणार आहे.
वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव या चारही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक रिक्षाने प्रवास करतात. गेल्या काही काळात वाढत्या लोकसंख्येसह शहरातील रिक्षांच्या संख्येतही वाढ झाली आहे. तर रिक्षाचे परवाने खुले झाल्यापासून मोठ्या संख्येने रिक्षा दाखल झाल्या आहेत.
यापूर्वी रिक्षा चालक शेअरिंग भाडे आकारून प्रवासी वाहतूक केली जात होती. मीटर असूनही मीटर भाड्याप्रमाणे प्रवासी वाहतूक सुरू नव्हती. त्यामुळे काही रिक्षा चालकांकडून अतिरिक्त भाडे आकारणे, प्रवाशांसोबत गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी नागरिकांमधून करण्यात येत होत्या.
यासाठी वसई विरार मध्ये मीटर रिक्षा सुरू करण्यात यावी अशी मागणी पुढे आली होती. याबाबत वसईच्या आमदार स्नेहा दुबे- पंडित यांनी पाठपुरावा सुरू केला होता. १५ नोव्हेंबर पासून मीटर रिक्षा सुरू करण्यात याव्यात अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्या होत्या. त्यानुसार शहरात १५ नोव्हेंबर पासून मीटर प्रमाणे रिक्षा प्रवासाची सुरवात करण्यात आली आहे. आमदार स्नेहा दुबे पंडित व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक उगळे, रिक्षा संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखवून या सेवेला प्रारंभ करण्यात आला आहे.
मीटर रिक्षा सेवेच्या प्रारंभामुळे विद्यार्थ्यांसह महिला, नोकरदार, व्यावसायिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि नियमानुसार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
जनजागृतीवर भर देणार
शहरात प्रथमच मीटर प्रमाणे प्रवासी वाहतूक सेवेला सुरवात केली आहे. आता या प्रवासी वाहतुकीला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यात समन्वय साधण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ज्या ज्या अडचणी असतील त्या सोडवून ही सेवा सुरळीत कशी करता येईल यासाठी आमचा प्रयत्न सुरू असेल अशी माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
शेअरिंग रिक्षा ही सुरू राहतील
मीटर प्रमाणे भाडे देणे सर्वच प्रवाशांना परवडणारे नाही यासाठी एकाच ठिकाणी जाणारे तीन प्रवासी एकत्र बसून ते शेअरिंगने जाऊ शकतात असेही परिवहन विभागाने सांगितले आहे.
असे असतील दर
मीटर रिक्षा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना दीड किलोमीटर प्रवासासाठी २६ रुपये तर मध्यरात्री २९ रुपये, ४.१० किलोमीटर साठी ७० रुपये तर मध्यरात्री ८८ रुपये, ६.७० किलोमीटर पर्यँतच्या प्रवसासाठी ११५ रुपये तर मध्यरात्री १४४ रुपये इतके पैसे मोजावे लागणार आहेत.
