वसई : वसई पश्चिमेच्या माणिकपूर मार्गावर रस्त्याच्या कडेला ट्रक बंद पडल्यामुळे नागरिकांना बुधवारी दीड तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तसेच यामुळे शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.
वसई पश्चिम परिसरातून माणिकपूर रस्ता गेला आहे. माणिकपूर रस्ता वसई गाव ते वसई रेल्वे स्थानकादरम्यानच्या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा असल्याने या मार्गावरून दुचाकी, चारचाकी, परिवहन विभागाच्या तसेच खाजगी बसेस आणि काहीवेळा अवजड वाहनांचीसुद्धा मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. पण बुधवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास स्टेला पेट्रोल पंपाजवळ बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या सामानाची वाहतूक करणारा ट्रक रस्त्यात अचानक बंद पडला. यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दीड तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
इंधन संपल्यामुळे ट्रक बंद पडला असल्याची माहिती ट्रक चालकाने दिली. माणिकपूर येथील रस्ता अरुंद असल्याने ट्रक बंद पडल्याने याचा परिणाम वाहतूकीवर झाल्याचे दिसून आले. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते तसेच या परिसरात शाळांची संख्याही मोठी आहे. शाळा सुटण्याच्या सुमारास वाहतूक कोंडी झाल्याने या रस्त्यावर काही काळ शाळेच्या बसेसच्या रांगा लागल्याचे दिसून आले. यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला.