वसई : वसई विरार महापालिकेकडून स्मशानभूमीत खेळण्याचे साहित्य बसविण्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. पालिकेने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून संबंधित अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वसई पश्चिमेच्या प्रभाग समिती ‘आय’ (वसई गाव) अंतर्गत असलेल्या बेणापट्टी भागात एक हिंदू स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीची दुरवस्था झालेली आहे. पालिकेने या स्मशानभूमीची दुरवस्था दूर करण्याऐवजी चक्क या स्मशानातच खेळण्याचे आणि मनोरंजनाचे साहित्य लावले आहे.
वेगवेगळ्या प्रकारची १५ हून अधिक साहित्य लावण्यात आली आहेत. त्यात झोपाळा, घसरगुंडी आदी साहित्यांचा समावेश आहे. (याबाबतचे वृत्त लोकसत्ता वसई विरार सहदैनिकात शुक्रवार २५ जुलै रोजी प्रसिध्द करण्यात आले होेते) या वृत्ताचे तीव्र पडसाद उमटले आहेत. नागरिकांबरोबर सर्वच राजकीय पक्षांनी या बेजबाबदार कृतीचा निषेध केला आहे.
पालिकेचे चौकशीचे आदेश
स्मशानात खेळण्याचे साहित्य बसविणे अंत्यत चुकीचे आणि संतापजनक आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिली. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यापैकी कुणालाच या कामाची माहिती नव्हती. आम्ही अशा अंसवेदनशील कृतीला परवागनी देऊच शकत नाही, असेही ते म्हणाले. या प्रकरणी चौकशीत जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असेही हेरवाडे यांनी सांगितले. शुक्रवारी अतिरिक्त आयुक्तांनी उद्यान विभागातील संबधित अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे सांगितले आहे.
उपहासात्मक लोकार्पण सोहळा
कॉंग्रेसने या कृतीवर जोरदार टिका केली आहे. मंगळवार पर्यंत ही खेळणी न काढल्यास पक्षातर्फे मंगळवार २९ जुलै रोजी या स्मशानभूमीतील खेळण्यांचा उपहासात्मक लोकार्पण सोहळा केला जाईल असे वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किरण शिंदे यांनी म्हटले आहे. शुक्रवारी त्यांनी या संदर्भात आय प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका खैरे यांची भेट घेतली. कॉंग्रेसच्या निलेश पेंढारी यांनीही संबंधीत दोषी अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.