वसई: वसई विरार शहरात वसई विरार शहर महापालिका हद्दीमध्ये सार्वजनिक दहीहंडी उत्सव, गणेश उत्सव व नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसाठी महापालिकेने एक खिडकी योजना सुरू केली आहे. त्यामुळे आता मंडळांना सर्व विभागांच्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळणे शक्य होणार आहे.
वसई विरार शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी सार्वजनिक दहीहंडी उत्सव, गणेश उत्सव व नवरात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. पण या अशावेळी या उत्सवांचे आयोजन करणाऱ्या मंडळांना मात्र विविध विभागांच्या परवानग्या मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. यासाठी यंदा वसई विरार महानगरपालिकेकडून एक खिडकी कक्ष उपक्रम राबविण्यात येणार आहे. ज्यामुळे मंडळांना वेगवेगळया कार्यालयात जाऊन स्वतंत्र अर्ज करण्याऐवजी एकाच छताखाली सर्व परवानग्या मिळतील.
मागील दोन वर्षांपासून ऑनलाईन प्रक्रियेद्वारे मंडळांना परवानगी दिली जात आहे. यावर्षीही सर्व मंडळांनी https://vvcmcpandalpermission.com/ या लिंकद्वारे किंवा क्यूआर कोड वापरून लॉग-इन करून आपले अर्ज सादर करावेत, असे महापालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.
अर्जदाराने पोर्टलवर अर्ज केल्यावर महापालिकेमार्फत अर्जाची प्राथमिक तपासणी केली जाईल. त्यानंतर तो अर्ज पोलीस विभाग, वाहतुक नियंत्रण शाखा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व अग्निशमन या विभागांकडे पुढील प्रक्रियेसाठी पाठविला जाईल. संबंधित विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र पोर्टलवर सादर होताच महापालिकेमार्फत संबंधित मंडळांना ऑनलाईन पोर्टलद्वारे परवानगी दिली जाणार आहे.
मोफत परवानगी सुविधा
महापालिकेच्या या एक खिडकी प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात जाणार नाही. तसेच सदर परवानगी प्रक्रियेसाठी संबंधित एक खिडकी कक्षामध्ये मंडळांना सदरचा अर्ज भरताना मदत करण्यासाठी महापालिकेचे कार्यालयीन अधिक्षक व संगणक ऑपरेटर कार्यालयीन वेळेत उपस्थित असणार आहेत. त्यामुळे मंडळांनी एक खिडकी कक्षाचा वापर करून अर्ज करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.