वसई: वसई विरार महापालिकेचे नगररचना उपसंचालक वाय एसआर रेड्डी यांना अखेर सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यांची विभागीय चौकशी देखील करण्यात येणार आहे. नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारत प्रकरणात वाय एस रेड्डी यांचा सहभाग आढळला होता. सक्तवसुली संचलनालयाने प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉंड्रींग कायद्याअन्वये भूमाफियांसह रेड्डी यांच्या हैद्राबाद येथील घरावर छापे घातले होते. या छाप्यात रेड्डी यांच्याकडे बेहिशोबी ८ कोटी ६ लाखांची रोकड आणि २३.२५ कोटींची दागिने असे ३० कोटींचे घबाड सापडले होते. रेड्डी यांचे कृत्य हे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक) यांच्या नियमांचे भंग करणारे असल्याने त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी आयुक्त अनिलकुमार पवार हे रजेवरून परतल्यानंतर त्यांनी निलंबनाच्या आदेशावर सही केली. याशिवाय रेड्डी यांची विभागीय चौकशी देखील केली जाणार असल्याची माहिती आयुक्त पवार यांनी दिली.
नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांची कारकिर्द वादग्रस्त राहिलेली आहे. यापूर्वी त्यांना शिवसेना नगरसेवाकाला १ कोटींची लाच दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होते. नालासोपारा येथील अग्रवाल नगरी मधील ४१ अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्यानंतर तेथील सांडपाणी आणि कचराभूमीचे आरक्षण हटविण्यात रेड्डी यांची भूमिका संशयास्पद असल्याने ते ईडीच्या रडारवर आले होते.
लाच प्रकरणातून मुक्ती आणि ईडीच्या चक्रात अडकले
वसई विरार महापालिकेच्या आस्थापनेवर वाय एस रेड्डी यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यात आली होती. २८ एप्रिल २०१६ रोजी वाय एस रेड्डी यांना तत्कालीन नगरसेवक धनंजय गावडे यांना २५ लाख रुपयांची लाच देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली होती. त्यावेळी ते ४८ तासांपेक्षा जास्त काळ पोलीस कोठडीत होते. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्या निलंबना विरोधात रेड्डी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. दरम्यान, ६ जून २०२३ रेड्डी यांच्याविरोधातील लाच प्रकरणातील खटल्यातून दोषमुक्त झाल्यानंतर ते पालिकेच्या सेवेत आजतायगाय कार्यरत होते.मात्र आता पुन्हा ते ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत. सध्या रेड्डी रुग्णालयात असून त्यांचे पुढील जबाब नोंदविल्यानंतर अटकेची कारवाई केली जाणार आहे.
शासनाकडे पालिकेचा प्रस्ताव
नगररचना विभागाचे वाय एस रेड्डी यांच्यावर कारवाई झाल्याने पालिकेचे उपसंचालक पद रिक्त झाले आहे. सद्यस्थितीत नगररचना सहायक संचालक चंद्रशेखर दिघावकर यांच्याकडे प्रभारी म्हणून कार्यभार सोपविण्यात आला आहे. उपसंचालक पदी नवीन नियुक्ती साठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे असे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले आहे.