विरार : वसई विरार शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या परिवहन विभागाने ई बस सेवा पुरविण्यावर भर दिला आहे. मात्र शहराच्या पूर्वेच्या भागातील विविध ठिकाणच्या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. अशा ठिकाणी ई बस चालविण्यास अडचणी येत आहेत.वसई विरार शहरात पालिकेच्या परिवहन विभागा कडून सेवा दिली जात आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात ११४ बसेस असून त्यांच्या मार्फत ३६ मार्गावर ही सेवा दिली जात आहे. दररोज या बसेस मधून ६० ते ६५ हजार इतके प्रवासी प्रवास करतात.मात्र शहराच्या वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेने या बसेस सुद्धा अपुऱ्या पडत आहे. तर काही ठिकाणच्या मार्गावर ही बसेस कमी फेऱ्या असल्याने प्रवाशांची फारच गैरसोय होत असते.
प्रवाशांना चांगली सुविधा उपलब्ध व्हावी व शहरातील प्रदूषण कमी व्हावे व पर्यावरण संतुलन राखले जावे यासाठी पालिकेने ई बस सेवा पुरविण्यावर भर दिला आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात ४० ई बस दाखल झाल्या असून त्या ई बस द्वारे ही प्रवाशांना सेवा दिली जात आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. विशेषतः शहराच्या पूर्वेच्या भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्या खड्ड्यांची पालिकेकडून दुरुस्ती ही केली जात नसल्याने याचा फटका आता पालिकेच्या परिवहन सेवेला बसू लागला आहे. अति खड्ड्यांच्या मार्गातून ई बस चालविणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या ई बस वसईच्या पश्चिम पट्टा व जिथे खड्ड्यांचे साम्राज्य कमी आहे अशा मार्गावर चालविल्या जात आहेत. खड्ड्यात ई बस चालविल्या तर एखादा पार्ट नादुरुस्त झाला तर मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे आता खुद्द परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या खड्ड्यांची दुरुस्ती होणे आवश्यक बनले आहे.
खड्डेमय रस्त्यामुळे बसेस खीळ खिळ्या
वसई विरार शहरात परिवहन सेवेच्या बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही वाढत आहे. तर दुसरीकडे सातत्याने खड्डेमय रस्त्यावरून प्रवासामुळे पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस ही खीळ खिळ्या झाल्या आहेत.दररोज १२ ते १५ बसेस या नादुरुस्त होत असल्याने परिवहन बस व्यवस्थापक यांनी सांगितले आहे.