वसई: वसई विरार महापालिकेच्या करसंकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीवर भर दिला आहे. यंदाच्या चालू आर्थिक वर्षात अवघ्या तीन महिन्यात महापालिकेने १२७ कोटींचा मालमत्ता कर वसूल केला आहे. वसई विरार भागात ९ लाखाहून अधिक छोट्या मोठ्या औद्योगिक वसाहती, उपहारगृहे, इमारती, सदनिका अशा विविध मालमत्ता आहेत. या मालमत्ताकरातून पालिकेला उत्त्पन्न मिळते. २०२४-२५ या आर्थिक वर्षात ३८५ कोटी रुपये इतका मालमत्ता कर वसूल केला होता.

यंदाच्या वर्षी ही महापालिकेने पाचशे कोटींचे कर वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार कर वसुली करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच मालमत्ता धारकांनी कर भरणा लवकर करावा यासाठी सवलत ही जाहीर केली होती. यात एप्रिल आणि जून महिन्यात मालमत्ता कर भरणाऱ्यांना करामध्ये ५ टक्के सूट तर संपूर्ण जुलै महिन्यात कर भरणाऱ्यांना ३ टक्के सवलत जाहीर केली आहे. याच योजनांना लाभ घेत कर दात्यांनी कर भरणा करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या तीन महिन्यांतच पालिकेने कर संकलनाचा शंभर कोटींचा टप्पा पार करत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १२७ कोटींचा कर वसूल केला आहे. मागील वर्षी याच दरम्यान केवळ ८६ कोटी कर वसूल झाला होता असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

पालिकेच्या सवलत योजनांमुळे, लवकर देयके वितरित केल्यामुळे आणि ऑनलाईन कर भरण्याचा पर्याय, ऑनलाईन देयके उपलब्ध करून दिल्यामुळे हे शक्य झाल्याचे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले आहे. चालू वर्षातील व थकीत कर धारकांनी कराचा भरणा करावा असे अवाहनही आयुक्तांनी नागरिकांना केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर संकलन अधिक प्रमाणात व्हावे यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना व उपक्रम राबविले जात आहे.तीन महिन्यात चांगली कर वसुली झाली आहे. त्यामुळे येत्या काळात ही मागील वर्षीच्या तुलनेत चांगली कर वसुली होईल. – दीपक झिंजाड, उपायुक्त ( कर संकलन) वसई विरार महापालिका