वसई : वसई विरार महापालिकेने शहरासाठी क्रीडासंकुल, सांस्कृतिक भवन, नाट्यगृह, रुग्णालय, सीएनडी वेस्ट प्रकल्प यासह इतर विकासात्मक कामे हाती घेतली आहेत. मात्र मागील पाच ते सहा वर्षांपासून ही कामे रखडली आहेत. या कामांना गती देण्यासाठी पुन्हा एकदा पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.
वसई विरार मधील खेळाडूंना विविध खेळासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालिकेतर्फे विरार येथील म्हाडा मैदानात भव्य स्वरूपाचे क्रीडा संकुल तयार करण्याचा निर्णय घेतला होता. नोव्हेंबर २०१७ मध्ये भूमिपूजन करून या कामाची सुरवात करण्यात आली होती. या संकुलात लांब उडी, गोळाफेक , चारशे मिटरचा सिंथेटीक रिनंग ट्रॅक,उंच उडी, भालाफेक, थाळीफेक, हातोडाफेक, फुटबॉल इत्यादि खेळांच्या सुविधांसह बास्केटबॉल, टेबलटेनिस, बॅडमिंटन, योगा अभ्यासाठी सुविधा, मार्शल आर्ट अशा विविध सुविधा उपलब्धता करून दिल्या जाणार आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून या क्रीडा संकुलाच्या कामाला गती मिळत नसल्याने ते रखडलेल्या स्थितीमध्ये आहे.
तर दुसरीकडे सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या वसईत वर्षभर अनेक सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रम होत असतात. नाट्यक्षेत्रात काम करणारे अनेक कलाकार ही या शहरात वास्तव्याला आहेत. यासाठी नालासोपाऱ्याच्या मजेठिया येथे २०२१ साली मजेठिया नाट्यगृहाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. काम वेळेत न झाल्याने २०२३ मध्ये पालिकेच्या विरोधात मानव अधिकार न्यायालयात दावाही दाखल करण्यात आला होता. त्यांनतर बांधकाम करण्यात आले मात्र नाट्यगृहाच्या आतील ध्वनिक्षेपण, वातानुकूलित आणि अग्निशमन अशा मुख्य यंत्रणांचा समावेश मंजूर अंदाजपत्रकात नसल्याने अजूनही रखडलेल्या अवस्थेत आहे.
तर विरारच्या गोकुळ टाऊनशिप मध्ये तयार होत असलेले सांस्कृतिक भवन ही अर्धवट अवस्थेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून या प्रकल्प रखडलेल्या अवस्थेत आहेत. जर ते असेच पडून राहिले तर त्याची सुद्धा दयनीय अवस्था होण्याची शक्यता आहे.या रखडलेल्या प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यासाठी आता नवनियुक्त आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.नुकताच आयुक्तांनी बांधकाम विभागाचे अधिकारी, अतिरिक्त आयुक्त यांनी रखडलेल्या प्रकल्पांच्या ठिकाणांना भेटी देत आढावा घेतला आहे. रखडलेले प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यात यावेत अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
याशिवाय राडारोडाचा प्रश्न ही गंभीर असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासाठी मान्यता मिळाली असून त्यासाठी १२ कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. त्याचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविला असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.
वसई विरार शहरात अनेक प्रकल्प हे मागील पाच ते सहा वर्षांपासून रखडलेले आहेत. अशा प्रकल्पांची पाहणी करून ते जलदगतीने कसे मार्गी लागतील यासाठी आमचा प्रयत्न राहील.मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त वसई- विरार महापालिका
रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न
नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथे पालिकेने २५० खाटांचे सुसज्ज रुग्णालय प्रस्तावित केले आहे. मात्र विविध प्रकारच्या अडचणींमुळे त्याची रखडपट्टी झाली आहे. या रुग्णालयाच्या जागेचा तिढा ही आता सुटला असून त्यासाठी पुढील प्रयत्न सुरू असल्याचे पालिकेने सांगितले आहे.
सॅटीस प्रकल्प राबविणे शक्य.
विरार पूर्व रेल्वे स्थानक परिसरात वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही वर्षांत विरार शहराची लोकसंख्या मोठ्या वेगाने वाढली आहे. दररोज हजारो प्रवासी विरार रेल्वे स्थानकाचा वापर करतात. मात्र, स्थानकाबाहेरील बेशिस्त वाहतूक व्यवस्था, प्रवाशांची अलोट गर्दी, रिक्षा-बस स्टँडचा गोंधळ आणि पादचाऱ्यांसाठी अपुऱ्या सुविधा यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हीच परिस्थिती सुधारण्यासाठी शहरात सॅटीस प्रकल्प लागू करण्याची मागणी केली जात आहे. हा प्रकल्प राबविणे शक्य असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.