वसई:- वसईत नाल्यावरील स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर पालिका खडबडून जागी झाली आहे. अखेर मंगळवारी पालिकेने वसईच्या नरवीर चिमाजी आप्पा मैदानाजवळच्या नाल्यावर उभारण्यात खाऊ गल्लीवर कारवाई करीत नाल्यावरील अतिक्रमण हटविले आहे.

वसईच्या नरवीर चिमाजी आप्पा मैदानाशेजारील मोठा नाला आहे. वसई-विरार महापालिकेने या नाल्यावर स्लॅब टाकला होता. त्यावर विक्रेत्यांनी बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थाच्या गाड्या लावल्या होत्या. येथे ८० हून अधिक विविध खाद्यपदार्थ्यांच्या गाड्या होत्या. या मैदानात विविध कार्यक्रम होत असतात शिवाय जवळच महाविद्यालय आहे. त्यामुळे येथे नागरिकांची मोठी गर्दी होत असते. हा नाला परिसर खाऊ गल्ली म्हणून प्रसिध्द झाला होता. 

यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या नाल्याचे संरचनात्कम लेखापरिक्षण (‘स्ट्रक्चरल ऑडिट`) केल्यानंतर हा स्लॅब अत्यंत धोकादायक असल्याचे जाहीर केले होते. हा स्लॅब अतिरिक्त भार घेऊ शकत नसल्याने वाढत्या भारामुळे स्लॅब कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाल्यावरील हातगाड्या हटविण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने बाजार विभागास पत्र दिले होते. तर याबाबत नागरिकांमधून हे अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी पालिकेकडे केली होती.  मात्र पालिकेने सुरवातीला केवळ नाला धोकादायक असल्याचा सूचना फलक लावला होता. 

नुकताच वसई पश्चिम येथील कृष्णा टाऊनशिपमधील नाल्याचा स्लॅब कोसळला. याच नाल्यावर पालिकेने उद्यान ही तयार केले होते. मात्र पावसामुळे मुलं त्या ठिकाणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली होती. या घटनेनंतर पालिकेने तातडीने वसई चिमाजी अप्पा मैदानाजवळच्या नाल्यावर  उभारलेल्या  खाऊ गल्लीवर कारवाई केली आहे ही कारवाई करून त्याठिकाणी असलेल्या खाद्य पदार्थांच्या गाड्या व शेड ही हटविण्यात आल्या असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.