वसई : वसई विरार महापालिकेने विविध प्रकल्प व उद्याने, खेळाची मैदाने यासाठी आठशेहून अधिक भूखंड आरक्षित केले आहेत. या आरक्षित भूखंडातून आतापर्यंत पालिकेला ५६ भूखंडाचा शोध लागला असून पुन्हा एकदा या आरक्षित जागांची चाचपणी केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. वसई विरार उपप्रदेशसाठी २००७ मध्ये मंजूर असलेल्या  विकास आराखडय़ात सुमारे ८७२ भूखंड विविध विकास कामांसाठी आरक्षित होते.  यातील १६२ आरक्षणे ही शासकीय जागांवर तर उर्वरित आरक्षणे ही खासगी जागेवर आहेत.

विकास आरखडा लागू होऊन देखील या  विकास आराखडय़ाची अंमलबजावणी झाली नव्हती. यातील पालिकेच्या ८७२  राखीव भूखंडांपैकी ३२९ भूखंडांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. तसेच काही भूखंडाची माहिती सुद्धा पालिकेकडे नव्हती. त्यामुळे विकासासाठी भूखंडाची माहिती व्हावी व तेथील अतिक्रमण काढून टाकता यावे यासाठी मागील दोन वर्षांपूर्वी पालिकेने या आरक्षित भूखंडाचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले होते. यात विशेषतः अतिक्रमण केलेले भूखंड सुद्धा पालिकेने ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती.

आतापर्यंत पालिकेला ५६ आरक्षित जागा ताब्यात घेण्यात यश आले आहे.या आरक्षित जागांचा वापर रुग्णालय, खेळाची मैदाने, उद्याने, सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र, नाट्यगृह, वाहनतळ व्यवस्था, आवश्यक शासकीय कार्यालये, सांडपाणी प्रकल्प, धारणतलाव, बस डेपो यासह इतर विकासात्मक कामासाठी त्यांचा वापर होणे आवश्यक आहे.यासाठी अशा आरक्षित जागांची पुन्हा एकदा चाचपणी करून त्या ताब्यात घेऊन त्यावर प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने विचार केला जाईल असे महापालिकेने सांगितले आहे.

आरक्षित जागांवरील अतिक्रमण हटविणार वसई विरार शहरात विविध ठिकाणी अतिक्रमणे करण्यात आली आहेत. याशिवाय जे ताब्यात घेतलेले भूखंड होते त्यावर ही अतिक्रमण झाल्याची तक्रार करण्यात आली होती. शहरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रकल्प राबवायचे असल्यास ते अतिक्रमण सर्वप्रथम बाजूला करावे लागणार आहे. ते कामही पालिकेकडून करून त्यांना संरक्षित केल्या जाणार आहेत. वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणात आरक्षित जागा आहेत. त्यांचा वापर हा लोकोपयोगी प्रकल्प उभारण्यासाठी होणे आवश्यक आहे. त्या जागा संरक्षित करून त्यावर प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील.मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त वसई विरार महापालिका

खेळाची मैदाने विकसित करण्यासाठी प्रयत्न खेळाची मैदाने ही शहराची फुफ्फुसे मानली जातात. त्या मैदानाचा वापर खेळण्यासाठीच होणे गरजेचे आहे. शहराच्या वाढत्या नागरिकरणामुळे जी खेळाची मैदाने आहेत ती सुद्धा अपुरी पडू लागली आहेत. यासाठी ज्या आरक्षित जागा आहेत त्यावर क्रीडा संकुले व मैदाने विकसित करण्यासाठी पालिका प्रयत्न केले जातील असे पालिकेने सांगितले आहे. आताची मुले ही मोबाईलमध्ये गुंतून राहिली आहेत. त्यांना मैदानी खेळाकडे वळविणे आवश्यक आहे असे पालिका आयुक्तांनी सांगितले.