वसई : वसई विरार शहरातील पूरनियंत्रणासाठी पालिकेकडून नालासोपारा निळेमोरे येथे धारण तलाव (होल्डिंग पोन्ड्स) विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याची अद्यापही प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने धारणतलाव करण्यासाठीचा प्रस्ताव केवळ कागदावर राहिला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मागील काही वर्षांपासून वसई विरारमध्ये पूरस्थितीची समस्या अधिकच गंभीर बनू लागली आहे. नैसर्गिक नाल्यावर करण्यात आलेले अतिक्रमण , बेकायदा माती भराव व नियोजन शून्य पद्धतीने बांधण्यात आलेली बांधकामे, पाणी निचरा होण्याच्या मार्गातील अडथळे अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे पूरस्थितीची समस्या निर्माण होत आहे. मागील पाच दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा शहर जलमय झाले.

अनेकांच्या घरात पाणी शिरणे, वाहतूक सेवा ठप्प होणे, जनजीवन विस्कळीत होणे अशा अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. या पूरस्थितीचा मोठा फटका हा वसई विरारच्या जनतेला बसतो. ही पूरस्थितीची समस्या सुटावी व यापुढेही पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिकेने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) या सत्यशोधन समित्यांची नियुक्ती केली होती. त्यांनी धारण तलाव विकसित होणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद केले होते. त्यानुसार महापालिकेने पालिकेने नालासोपारा पश्चिमेतील नीळेमोरे सर्व्हे क्रमांक १७९, हिस्सा न १ /ड या जागेवर १९ हजार ८६०. ६४ चौरस मीटर इतक्या क्षेत्रात धारणतलाव तयार करण्याचे निश्चित करण्यात आले होते. तसा प्रस्ताव ही तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाला चार ते पाच वर्षे उलटूनही त्यावर कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे पालिकेने निर्धारित केलेले धारणतलाव हे कागदावरच राहिले आहेत.

तर दुसरीकडे वसई पूर्वेच्या एव्हरशाईन रस्त्याची उंची वाढविल्यानंतर आता वसंतनगरी जवळील मोकळ्या जागेत धारणतलाव तयार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मात्र त्याठिकाणी सुद्धा आवश्यक ती पावले उचलली गेली नसल्याने धारण तलाव तयार होऊ शकली नाहीत. धारण तलावांची निर्मिती झाली नसल्याने शहरातील पूरस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. शहराच्या पूरस्थितीचा विचार करता आता तरी पालिकेने उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात येत आहे. आम्ही धारण तलाव तयार करण्यासाठी स्वारस्य अभिरुचीच्या (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट ) संदर्भात निविदा काढल्या होत्या त्याला प्रतिसाद मिळाला नाही असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

ईओआय निविदेला प्रतिसाद नाही

पालिकेने पालिका स्तरावर उपाययोजना आखण्यास सुरुवात केली होती. पहिल्या टप्प्यात पालिकेने धारण तलाव तयार करण्यास प्राधान्य दिले होते. नालासोपारा येथील निळेमोरे येथील ६५ एकर जागा ताब्यात घेऊन त्याठिकाणी खोदकाम करावे लागणार होते. यासाठी अधिक खर्च येणार असल्याने उपाय म्हणून पालिकेने आता ज्यांना ही माती हवी असेल त्यांनी ही माती स्वखर्चाने उचलून न्यावी यासाठी ईओआय ४ वेळा निविदा काढल्या होत्या त्याला ही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

धारणतलावासाठी ईमेल पाठवा मोहीम

गोगटे मिठागराची १५०० एकर जागा ही राज्य सरकारच्या मालकीची आहे. करार संपल्यानंतर सदर जागा रिक्त असून, पावसाळ्यात ती खाडीचे स्वरूप धारण करते. या भागात गास, सोपारा, निर्मळ, वाघोली, नवाळे, सालोली, सांडोर, चुळणे, भुईगाव, आचोळे, बोळींज, उमराळे-करमाळे, नालासोपारा व नवघर-माणिकपूर या गावांचे पाणी साठते. तसेच ही जागा सीआरझेड क्षेत्रात येत असल्याने पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाची आहे. या जागेत धारणतलाव तयार करण्यात यावे या मागणीसाठी आता वसईतील नागरिकांनी शासनाला ईमेल पाठवा मोहीम सुरू केली आहे असे सामाजिक कार्यकर्ते जॉय फरगोस यांनी सांगितले आहे. आताच इतकी भयावह स्थिती आहे तर भविष्यात आणखीनच स्थिती बिकट होईल यासाठी धारणतलाव गरजेचे आहेत. यासाठी कोणत्याच हालचाली न झाल्यास आंदोलन करू असा इशारा ही जॉय फरगोस यांनी दिला आहे.