वसई: नुकताच नालासोपाऱ्यात जीर्ण इमारत कोसळल्याच्या घटनेनंतर शहरातील जीर्ण इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी स्वतंत्र धोरण तयार करून निर्णय घेण्यात यावा अशी मागणी पुढे आली आहे.

वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात अनेक वर्षे जुन्या इमारती आहेत. यातील काही इमारती जीर्ण झाल्याने शहरात इमारत कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. यावर्षी पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात सुमारे ९२ इमारती या धोकादायक असल्याचे समोर आले आहे. नालासोपारा पूर्वेच्या अलकापुरी येथील साईराज अपार्टमेंट ही चार मजली इमारत कोसळली. या इमारतींचा धोका अन्य दोन इमारतींना पण बसला त्यामुळे त्यासुद्धा पाडाव्या लागल्या. इमारत पडल्याने शेकडो कुटुंबांचे संसार हे रस्त्यावर आले आहेत. त्यांना राहण्यास संक्रमण शिबीर व इतर सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत.

या घटनेचे पडसाद सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात ही उमटले आहेत. याबाबत नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांनी शहरातील मोडकळीस झालेल्या इमारतींचा मुद्दा उपस्थित करून लक्ष वेधले आहे. वसई विरार शहरात अशा जीर्ण झालेल्या शेकडो इमारती आहेत. मात्र त्यासाठी धोरण नसल्याने घटना घडते तेव्हा अशा नागरिकांना बेघर होण्याची वेळ येते. यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. त्याचप्रमाणे वसई – विरार मध्ये अनेक अनधिकृत इमारती आहेत. याशिवाय काही इमारती आरक्षित भुखंडांवर असल्यामुळे पुनर्विकास करताना अनेक समस्या ओढावतात यामुळे या इमारतींसाठी स्वतंत्र धोरण ठरविण्यासाठी शासन स्तरावर एक संयुक्त बैठक आयोजित करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

म्हाडाची घरे तात्पुरता स्वरूपात उपलब्ध करून द्या

विरारच्या बोळींज येथे म्हाडा ने हजारो सदनिका उभारल्या आहेत. मात्र सद्यस्थितीत या संपुर्ण सदनिका रिकामी अवस्थेत आहेत. सध्या वसई विरार शहरात जीर्ण इमारत कोसळल्याने अनेक कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे. अशा नागरिकांना ही घरे तात्पुरता स्वरूपात नागरिकांना राहण्यास उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार राजन नाईक यांनी सभागृहात केली आहे. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ही याबाबत माहिती घेतली जाईल तसेच सदस्यांची बैठक होईल तेव्हा आमदारांना ही बोलावून पुढील निर्णय घेतला जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिकेचे संक्रमण शिबीर नाहीच

धोकादायक अवस्थेत असलेली इमारत खाली करण्यासाठी व सुरक्षेच्या दृष्टीने अन्य ठिकाणी जाण्याच्या सूचना जरी केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात संक्रमण शिबीर उपलब्ध नसल्याने अनेक नागरिक इमारती खाली करण्यास पुढे येत नाहीत. दरवर्षी शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न निर्माण होतो. त्या अनुषंगाने संक्रमण शिबिराचे नियोजन करावे अशी मागणी करण्यात येत आहे.