जानेवारीत ९४५ वाहनांची विक्री; पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांचा पुढाकार
विरार : वसई-विरारमध्ये पर्यावरण संरक्षणासाठी मोठे प्रयत्न सुरू झाले आहेत. महानगरपालिकेने परिवहन बसच्या ताफ्यात विद्युत बस घेतल्यानंतर शहरातील नागरिकसुद्धा विद्युत वाहन खरेदीला पसंती देत असल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी महिन्यात वाहन खरेदीत वाढ होऊन ९४५ विद्युत वाहनांची विक्री झाल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. वाढत्या विद्युत वाहनामुळे शहरातील प्रदूषणाचा धोका कमी होणार आहे.
वाढते इंधनाचे दर पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यावर उपाय महणून बाजारात विद्युत वाहनाचा पर्याय उपलब्ध होत झाल्याने नागरिकांनी याला पसंती दर्शवली आहे. दोन वर्षांत वसईकरांनी केवळ २३८ विद्युत वाहने वसईत खरेदी झाली होती. नंतर इंथन बचत आणि पर्यावरणाला संरक्षणाला ही वाहने पूरक असल्यामुळे ही विद्युत वाहने खरेदी करण्याकडे वसई-विरार नागरिकांचा कल वाढत आहे. नवीन वर्षांच्या पहिल्याच महिन्यात ९४५ वहानांची विक्री झाली आहे. इतर वाहनचा तुलनेने तीन पटीने विद्युत वाहनाच्या खरेदीत वाढ झाल्याचे परिवहन विभागाने सांगितले. यामध्ये सर्वाधिक संख्या दुचाकींची आहे. त्यामुळे नागरिकांचा विद्युत वाहनांकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.
शासनाकडून विद्युत वाहनांना चालना मिळावी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध योजना आखाल्या जात आहेत. त्यासाठी शहरात राष्ट्रीय हवा संवर्धन कार्यक्रमातून वसई-विरार महानगर पालिकेकडून शहरात विद्युत वाहने चार्जिग करण्यासाठी चार्जिग स्टेशन उभारली जाणार असल्याची माहिती मुख्य शहर अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली आहे.
वसईत मागील काही वर्षांत वाहनाची संख्या वाढली असल्याने शहराच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. यासाठी पालिकेने पर्यावरण पूरक अशा विद्युत वाहनांना चालना देण्याचा विचार केला आहे.
वसईत सन २०१९ मध्ये केवळ ५२ विद्युत वाहनांची खरेदी झाली. तर सन २०२० मध्ये १८६ विद्युत वाहनांची खरेदी केली. जानेवारी पर्यंत २०२२ पर्यंत विक्रमी अशी ९४५ वाहनांची खरेदी वसईकरांनी केली असून त्याची नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे.
दुचाकी वाहनाच्या जोडीला या वर्षी चारचाकी वाहन खरेदीतसुद्धा वाढ झाली आहे. पण सर्वाधिक दुचाकी खरेदी केल्या जात आहेत. विशेष म्हणजे विद्याुत वाहनांच्या खरेदीवर जीएसटी, नोंदणी तसेच अन्य सूट देण्यासह सरकार वाहन खरेदीकरिता अनुदानदेखील देत असल्याने नागरिक आता विद्युत वाहने खरेदी करणे पसंत करत आहेत. सध्या शहरात विद्युत वाहनांचे चार्जिग स्टेशन उपलब्ध नाहीत. पण ही स्टेशन उपलब्ध झाल्यास अधिक जलद गतीने विद्युत वाहने खरेदी केली जातील.
पर्यावरणासह इंथन बचत
विद्युत वाहनांमुळे मोठय़ा प्रमाणात इंधन बचत होत असल्याने पर्यावरणाला याचा मोठा फायदा होणार आहे. नॅशनल ऑटोमोटिव्ह बोर्डाच्या माहितीनुसार, विद्युत वाहन वापरामुळे दररोज सुमारे ९९ हजार किलो कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन रोखता येणे शक्य आहे. यामुळे विद्युत वाहनाचा वापर वाढल्यास शहरातील हवेची गुणवत्ता वाढली जाणार आहे. यामुळे नागरिकांचे स्वास्थ्य सुधारण्यास मदत होईल.
वाहनांची विक्री
वाहन प्रकार २०१९ २०२० २०२१
दुचाकी ४८ १२० ७६४
चारचाकी ३ ५१ १६३
टुरिस्ट कॅब ० ० ८
तीनचाकी १ १५ ९
एकूण ५२ १८६ ९४५