सिद्धार्थ म्हात्रे

विरार : वसई-विरारचा परिसर हरित पट्टा आणि इथली समृद्ध शेतीची परंपरा यामुळे प्रसिद्ध आहे. एकेकाळी इथली विड्याची पाने थेट पाकिस्तानपर्यंत निर्यात होत असत तर वसईची केळीही सुप्रसिद्ध आहेत. मात्र बदलत्या काळात पारंपरिक शेती करणे आव्हानात्मक होत असल्या कारणाने शेतकरी आता ड्रॅगन फ्रुटच्या शेतीकडे वळले आहेत.

वसई विरार परिसरात झपाट्याने नागरीकरण होत असले तरीही आजही विशेषकरून शहरच्या ग्रामीण आणि पश्चिम भागात मोठया प्रमाणावर शेती केली जाते. इथले हवामान अनेक पिकांसाठी पोषक मानले जाते. अनेक शेतकरी प्रयोगशील शेतीचे यशस्वी प्रयोग करत असतात. त्यातच आता ड्रॅगन फ्रुट पिकाची भर पडली आहे. सुरुवातीला प्रयोग म्हणून केलेल्या या फळाच्या शेतीकडे आता शेतकरी मुख्य उत्पादन म्हणून पाहू लागले आहेत.

वसईच्या गिरीज येथील प्रयोगशील शेतकरी अ‍ॅग्नेलो फिलिप बाप्तिस्ता यांनी वसईत सर्वात प्रथम या फळाची लागवड केली. सुरुवातीला त्यांनी १० गुंठे क्षेत्रात फळांची लागवड केली. त्याच वर्षी त्यांना तीन लाख इतके उत्पन्न मिळाले. सध्या त्यांनी दीड एकरवर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. त्यातून सुरुवातीला त्यांना अकरा महिन्यात आठ ते नऊ लाखाचे उत्पन्न मिळाले होते असे त्यांनी सांगितले. वसईत अजूनही ड्रॅगन फ्रुटची शेती वाढायला हवी, त्यातून शेतकऱ्यांना अधिकाधिक नफा मिळू शकतो असेही त्यांनी सांगितले.

विरार पश्चिमेच्या ज्योती गावात राहणाऱ्या गॉडफ्री बरबोज यांनी आपल्या वाडीत २० गुंठे क्षेत्रावर ड्रॅगन फ्रुटची शेती केली आहे. बरबोज यांनी एका शेती प्रदर्शनातून रोप आणून आपल्या शेतात प्रयोग करून पाहिला होता. त्यानंतर त्यांनी मोठया प्रमाणावर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. लाल , पिवळ्या आणि केशरी रंगांच्या प्रजातींची त्यांनी लागवड केली आहे. त्यातून होणाऱ्या उत्पादनातून त्यांना फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ग्राहक थेट शेतात येत असल्याने ते तिथेच फळांची विक्री करतात. तर वटार येथील शेतकरी अरुण नाईक यांनी सध्या पाच गुंठ्यावर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. उत्पन्न चांगले येत असल्याने लागवडीत वाढ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मजुर न मिळणे, वातावरणीय बदल, औषध फवारणीसाठी येणारा भरमसाठ खर्च यामुळे पारंपरिक शेतीकडून आता शेतकरी नव्या प्रयोगशील शेतीकडे वळत आहेत. सध्या बाजारात ड्रॅगन फ्रुटला ग्राहकांची पसंती मिळत आहे.

ड्रॅगन फ्रुटला वसईतून चांगली मागणी आहे. यामुळे स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. ग्राहक थेट शेतात येत असल्याने आम्हालाही विक्री करणे सोयीस्कर होते. वसईत पिकलेल्या फळांची चवही वैशिष्ट्यपूर्ण आहे असे शेतकरी अ‍ॅग्नेलो बाप्तिस्ता यांनी सांगितले.

ड्रॅगन फ्रुट पिकाचा देखभाल खर्च कमी आहे. सुरुवातीला यात गुंतवणूक करावी लागते. वसईतील वातावरण या फळाला पोषक आहे. पारंपरिक शेतीपेक्षा यातून चांगले उत्पन्न मिळते. गॉडफ्री बरबोज, शेतकरी