विरार : वसईचा परिसर सध्या पावसामुळे हिरवागार झाला असून देशी आणि स्थलांतरित पक्ष्यांसाठी पोषक वातावरण शहरात तयार झाले आहे. वसई-उमेळा फाटा आणि दत्तानी मॉल परिसरात चित्रबलाक पक्ष्यांची गर्दी झाली आहे. इथल्या हिरव्यागार विस्तीर्ण पाणथळ भागात मोठ्या प्रमाणात विसावलेले हे पक्षी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. यामुळे पक्षी अभ्यासक आणि नागरिकांना पक्षी निरीक्षणाची संधी मिळाली आहे.

वसई विरारचा परिसर नैसर्गिकदृष्टया अतिशय समृद्ध आहे. पश्चिम बाजूला विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि पूर्वेला तुंगारेश्वर अभयारण्य तसेच खाडीचे प्रदेश आहेत. यामुळे हा परिसर कायम स्थलांतरित आणि दुर्मिळ पक्ष्यांसाठी निवारा राहिला आहे. इथे असणाऱ्या किनारपट्टी आणि पाणथळ भागांतील परिसंस्था पक्ष्यांना आकर्षित करतात. यामुळे भारतीय उपखंडातून येणारे अनेक पक्षी इथे आश्रयाला येत असतात. सध्या वसईच्या उमेळा फाटा परिसरात चित्रबलाक पक्षी विसावले असून यामुळे इथला परिसर मनमोहक दिसत आहे. मराठीत या पक्षाला चित्रबलाक किंवा रंगीत करकोचा अशी नावे आहेत अशी माहिती नायगाव येथील रहिवासी चेतन घरत यांनी दिली.

रंगांमुळे चित्रबलाक वैशिष्ट्यपूर्ण

चित्रबलाक या पक्ष्याला इंग्रजीमध्ये पेन्टेड स्टॉर्क असे म्हटले जाते. चित्रबलाक सिकोनिडी कुलातील असून हा पक्षी प्रामुख्याने भारतीय उपखंड आणि आग्नेय आशियात आढळतो. या पक्ष्याच्या पाठीवरील पिसे पांढरी असतात तर छातीवरील पिसांवर हिरवट काळ्या रंगाच्या खुणा असतात. पाठीवरच्या पिसांच्या टोकांकडील गुलाबी रंगामुळे आणि आकारामुळे हा पक्षी वैशिष्ट्यपूर्ण दिसतो.

पाणथळ भागात आश्रय

चित्रबलाक भारतात विशेषतः नद्या, तलाव आणि भातशेती अशा पाणथळ प्रदेशात आढळतो. मासे, बेडूक, गोगलगाय आणि इतर लहान जलचर प्राणी हा या पक्षाचा प्रमुख आहार आहे. हा पक्षी थव्याने राहत असून एकत्र शिकार करतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील काही वर्षात इतर शहरांप्रमाणे वसईतही वाढत्या शहरीकरणामुळे पाणथळ अधिवास आपले अस्तित्व हरवत आहेत. वसईतील पाणथळ जागा या जैवविविधतेला पोषक वातावरण निर्माण करणाऱ्या असल्याने या जागांचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे पक्षी अभ्यासक रमेश शेणाई यांनी सांगितले आहे.