वसई : वसई-विरार महापालिकेने एकापाठोपाठ एक अशी अत्याधुनिक वाहने खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. विद्युत विभागात दुरुस्ती-देखभाल करण्यासाठी वाहने अपुरी पडत असल्याने आणखी तीन हायड्रोलिक शिडी असलेली वाहने घेण्यात येणार असून यातील एक वाहन  दाखल झाले आहे.

वसई-विरार महापालिकेच्या दिवाबत्ती विभागाकडून पालिका कार्यक्षेत्रात रस्त्यावरील उद्यान, तलाव, मैदान, स्मशानभूमी इत्यादी ठिकाणी दिवे लावून त्याची दैनंदिन दुरुस्ती प्रभागनिहाय करण्यात येते. महानगरपालिका कार्यक्षेत्रात ग्रामीण  व अंतर्गत भागातील विद्युत देखभाल-दुरुस्तीची कामे करण्याकरिता सध्या ५ हायड्रोलिक लॅडर वाहने होती. मात्र कार्यक्षेत्राच्या अनुषंगाने ही वाहने अपुरी पडत होती. याच अनुषंगाने वाहन विभागामार्फत ३ हायड्रोलिक लॅडर वाहने खरेदी करण्याबाबत ई-निविदा प्रक्रिया करून २ ऑगस्ट रोजी ११ मीटर उंचीचे एक वाहन घेण्यात आले आहे. उर्वरित दोन वाहने लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

वाहनांची वैशिष्टय़े म्हणजे या युटिलिटी वाहनांवर हायड्रोलिक लॅडर बसविण्यात आले असल्याने त्यास लागणारे इंधन व देखभाल-दुरुस्तीच्या खर्चात पालिकेची आर्थिक बचत होणार आहे. त्याचप्रमाणे वाहनाचा आकार कमी असल्याने सदर वाहन कमीत कमी जागेच्या ठिकाणी जाऊन शहराच्या ग्रामीण व अंतर्गत भागातील दिवाबत्ती देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यास मदत होणार आहे.