विरार : आपल्या लाडक्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करणार्या विरारमधील जोविल कुटुंबावर काळाचा आघात झाला. इमारत दुर्घटनेत एक वर्षाच्या चिमुकल्या उत्कर्षासह तिची आई आरोही (२४) यांचा मृत्यू झाला तर वडीलांचा अजूनही शोध सुरु आहे. आई आणि मुलीचा वाढदिवशीच झालेला करूण अंत सर्वांनाच चटका लावून गेला.
विरार पूर्वेच्या विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट मध्ये ओंकार जोविल (२७) हे पत्नी आरोही जोविलसह (२४) राहात होते. जोविल दांपत्याला उत्कर्षा ही मुलगी. मंगळवारी तिचा पहिला वाढदिवस. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. घरात पाहुणे, मित्र परिवार जमला होता. सगळं आनंदात सुरू होतं. उत्कर्षाच्या वाढदिवसानिमित्त घरीच छोटेखानी सोहळा आयोजित केला होता. यासाठी सजावटही करण्यात आली होती. नवीन कपडे घातलेल्या उत्कर्षासोबत आलेल्या पाहुण्यांनी फोटोही काढले. मात्र त्यानंतर झालेल्या या घटनेमुळे वाढदिवसाचे हेच फोटो अंतिम ठरले आहे. वाढदिवसाचीच रात्र त्यांच्यासाठी काळरात्र ठरली. रात्री इमारतीचा भाग कोसळला आणि जोविल कुटुंबीय इमारतीच्या ढिगाखाली गाडले गेले. अग्निशमन दलाने तातडीने बचाव कार्य सुरू केले. मात्र ढिगार्यातून निघाले ते मायलेकीचे मृतदेह. मायलेकीचा असा करुण अंत पाहून सारेच हेलावले. ओंकार जोविल यांचा शोध अजूनही सुरूच आहे.
मृतांची संख्या ७ वर
बुधवार दिवसभर बचावकार्य सुरू होते. संध्याकाळपर्यंत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या १६ रहिवाशांची सुटका करण्यात आली. मृतांची संख्या ७ वर पोहोचली असून ९ जखमींवर विरारमधील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.