पाणी निचऱ्याचा प्रयोग अयशस्वी

शहरात साचणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचा पालिकेचा प्रयोग अयशस्वी ठरला आहे.

वसईत आधुनिक तंत्रज्ञान वापरूनही पावसाचे पाणी जमिनीत मुरलेच नाही

वसई :  शहरात साचणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचा पालिकेचा प्रयोग अयशस्वी ठरला आहे. पालिकेने शहरातील चार ठिकाणी आधुनिक तंत्रत्रान वापरून हा प्रयोग सुरू केला होता. मात्र पाण्याचा जमिनीत निचरा झालाच नाही आणि प्रयोग फसला.

वसई-विरार शहरात दरवर्षी पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन शहर जलमय होण्याची समस्या निर्माण होत असते. नियोजनाअभावी वाढत असलेल्या शहरीकरणामुळे शहराच्या अनेक सखल भागात पाणी साठत असते. या पूर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी नेमलेल्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (निरी) समितीने शहरातील पाणी साठण्याच्या ३० जागा शोधून काढल्या होत्या. दाटीवाटीने असलेल्या इमारती आणि पाणी जाण्याचे मार्ग बंद झालेल्या या भागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साठत असते. ही समस्या सोडविण्यासाठी धारण तलाव (होल्डिंग पॉण्डस) तयार करावेत, अशा सूचना निरी समितीने सुचविल्या होत्या. मात्र शहरात धारण तलाव करणे शक्य नसल्याने पालिकेने इतर पर्यायांचा विचार सुरू केला होता. त्याचा शोध सुरू असताना पाालिकेने पावसाचे पाणी जमिनीतच साठवून या समस्येवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला होता. पाणी या विषयावर काम करणाऱ्या वॉटर फिल्ड रिसर्च फाउंडेशन या संस्थेने नंदुरबार, नाशिक या ठिकाणच्या आश्रमशाळांमध्ये नैसर्गिकरित्या पाणी जमिनीत साठवण्याचा प्रयोग यशस्वीरित्या केला होता. त्याचाच  आधार घेऊन पावसात शहरात साचलेले पाणी जमिनीतच मुरवले तर पूराच्या पाण्याची समस्या नष्ट होईल आणि जमिनीची भूजल पातळी वाढू शकेल असा पालिकेचा प्रयत्न होता. हा दुहेरी फायदा लक्षात घेऊन पालिकेने संस्थेच्या वॉटरफिल्ड टेक्नॉलॉजी या कंपनीला हे काम दिले होते. त्यांनी नालासोपारा पुर्वेच्या तुळींज येथे प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प हाती घेतला होता.

पाण्याचा निचरा न झाल्याने पालिकेची निराशा झाली.  आम्ही वसई वसई—विरारमधील भूस्तराचा अभ्यास करण्यात करून भूस्तराची पाहणी करून कोणत्या ठिकाणी भूजल पातळी किती आहे याचे सर्वेक्षण केले होते.  त्यानंतर पावसाळ्यात डोंगरावरून येणारे पाणी सरळ सागरी खाडीत न जाता ते त्याच ठिकाणी जमिनीत सोडण्यासाठी रिचार्ज शाफ्ट (बोरिंग) खोदण्यात आले. पेल्हार येथील व वसई पूर्व परिसरात चाचणी साठी ४ बोरिंग खोदण्यात आले होते. त्यामध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आले होते. मात्र या ठिकाणी पाणी संपूर्णपणे जमिनीमध्ये न मुरता काही प्रमाणावर शिल्लक राहिले होते. चारही ठिकाणी भूजल पातळी जास्त असल्याने हा प्रयोग अयशस्वी झाल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

असा होता प्रयोग

प्रयोगाअंतर्गत नालासोपारा पुर्वेच्या तुळींज येथे ३० ठिकाणी पाणी शोषून घेणाऱ्या विहिरी (इंटेक वेल) बांधल्या जाणार होत्या. पावसाळ्यात पुराचे पाणी साचल्यावर या विहिरी पाणी खेचून ते पाणी मग इंजेक्शनच्या आकाराच्या बोअरवेलमधून जमिनीत २०० फुटांपर्यंत खाली मुरवले जाणार होते.  या ठिकाणी जमिनीखाली असलेल्या दगडांच्या नैसर्गिक भेगांमधून पाणी जमिनीत मुरणार होते.  या बोअरवेलची रचना इंजेक्शनच्या आकाराची असल्याने त्याची क्षमता दिवसाला ५० हजार लिटर पाणी शोषून घेण्याची होती. पालिकेने शहरातील  ४ ठिकाणी विहिरी बांधल्या. मात्र पावसाळ्यात पाणी जैसे थे होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Water drain experiment failed vasai ssh

Next Story
१३१ दिवसांत दीड लाख लसीकरण
ताज्या बातम्या