विरार : वसई विरार शहरात वाढती पाण्याची समस्या पाहता भारतीय जनता पार्टीने शुक्रवारी वसई-विरार महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अटकाव केला असता त्यांच्यावर मोर्चात आणलेली मडकी फेकण्यात आली. विरार पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
वसई-विरार शहरात मोठय़ा प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरात मागील काही दिवसांपासून तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. यामुळे नागरिकंना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यात प्रमुख्यावे विरार पूर्वेला मोठय़ा प्रमाणात नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात.
अनेक गृहसंकुलांना दर महिन्याला ३० ते ४० हजार रुपये टँकरसाठी मोजावे लागतात. महिनाभराची पाणीपट्टी घेऊन केवळ १० ते १२ दिवसच पालिकेकडून पाणी दिले जाते. तर दुसरीकडे पालिका पाण्याचा पूर्ण साठा असल्याचा दावासुध्दा करते. यामुळे संतप्त नागरिकांनी शुक्रवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला.
यावेळी पोलिसांनी आंदोलकांना मुख्यालयाच्या अगोदरच रोखण्याची व्यवस्था केली होती. मोर्चा येताच पोलिसांनी त्यांना रोखले. यात पोलीस आणि आंदोलक यांच्यात चांगलीच जुंपली होती. दरम्यान काही आंदोलकांनी मोर्चासाठी आणलेली मडकी पोलिसांच्या दिशेने फेकली. सुदैवाने ही मडकी कुणाला लागली नाही. पण विरार पोलिसांनी आयोजक, पदाधिकारी आणि इतर आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.