नाका कामगारांची परवड

विरार : करोनाकाळात स्थलांतरित झालेले हजारो कामगार करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा शहराकडे वळू लागले आहेत. पुन्हा एकदा कामगार नाक्यांवर कामगारांची गर्दी दिसू लागली. पण या नाक्यांवर कोणतीही सुविधा नसल्याने कामगारांचे हाल होत आहेत.  

 करोना टाळेबंदीच्या अटी शिथिल झाल्याने बांधकाम व्यवसायाला पुन्हा गती मिळाली आहे. शहरातील कामगार नाके पुन्हा कामगारांनी फुलू लागले आहेत. वसई-विरारसह पालघर, बोईसर, डहाणू, वाडा, जव्हार, मोखाडा या परिसरातून हजारो कामावर दररोज वसईत कामगार नाक्यावर येतात. यात गवंडी, मेस्त्री, सुतार,  मदतनीस, नळजोडणी कारागीर, इलेक्ट्रिशियन आदी कामगारांचा समावेश असतो. रोजंदारीवर हे कामगार शहराच्या विविध भागांत कामे करतात. पण हे ज्या कामगार नाक्यावर उभे राहतात त्या ठिकाणी त्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीत. वसई-विरार परिसरात विरार पूर्व महापालिका टोटाळे तलाव, नालासोपारा पूर्व स्टेशन परिसर, धानीव, पेल्हार, वसई माणिकपूर, वालीव, तुंगारेश्वर, आदी परिसरात कामगार नाके अनेक वर्षांपासून भरत आहेत.

सध्या या नाक्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. महापालिकेकडे या कामगार नाक्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे पालिकेने सांगितले. यामुळे हे नाके असेच उपेक्षित राहणार की काय असा सवाल येथील कामगार विचारत आहेत.

 काही वर्षांपूर्वी महापालिकेचे माजी महापौर राजीव पाटील यांनी कामगार नाक्याकडे लक्ष पुरविले होते, त्यांनी या कामगारांना साधारण सुविधा पुरविल्या होत्या. पण पालिकेने या बाबत कोणतेही सातत्य ठेवले नसल्याने पुन्हा हे नाके भकास झाले आहेत. महापालिकेने या कामगार नाक्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांची आखणी करून देवून त्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, याकडे राजीव पाटील यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

समस्यांनी त्रस्त

नालासोपारा येथील विजू राठोड या मजुराने सांगितले की,  हजारो मजूर या ठिकाणी कामासाठी उभे राहत असताना त्यांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही आहे. त्याचबरोबर शौचालय, बसण्यासाठी अथवा उभे राहण्यासाठी शेड नाहीत. यात महिलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. नाक्यावर अनेक मजूर हे जोडप्याने येत असल्याने त्यांच्या जोडीला लहान मुलेसुद्धा असतात, अनेक वेळा ठेकेदार अथवा विकासक कामगाराची  रोजंदारीवरून मारहाण करतात. नाके रस्त्याच्या कडेला भरत असल्याने अनेक छोटेमोठे अपघात होतात.    अशावेळी त्यांना किमान प्रथोमाचार पेटी असणे आवश्यकता भासते. त्याचबरोबर फेरीवालेसुद्धा या ठिकाणी बस्तान मांडत असल्याने त्यांच्याबरोबर वाद होत राहतात.    कोणत्याही सोईसुविधा नसल्याने कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

या कामगार नाक्यांच्या बाबतीत आम्ही माहिती घेत आहोत, तसेच प्रभाग समितीनिहाय यांना कोणत्या सुविधा पोहचविता येथील याचा विचार सुरु आहे. लवकरच या कामगार नाक्यावर प्राथमिक सुविधा दिल्या जातील.

 -आशिष पाटील, अतिरिक्त आयुक्त वसई-विरार महानगरपालिका

महापालिकेने या कामगार नाक्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांची आखणी करून देवून त्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. -राजीव पाटील, माजी महापौर, वसई-विरार महानगरपालिका