गेल्या वर्षांत रिअल इस्टेट क्षेत्राने अनेक चढ-उतार पाहिले. काही तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही महिन्यांपासून घरांच्या किमती स्थिर आहेत, यात फार चढउतार झालेले नाहीत. नवीन बांधकाम तसेच रिसेल घरांनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद अजूनही आहे. अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापकी एक मानला जातो.

महाराष्ट्रात सणासुदीच्या काळात घर घेण्याला अधिक महत्त्व दिले जाते. गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया, दिवाळी अशा सणांना घरखरेदी करणऱ्या ग्राहकवर्गात मोठा उत्साह असतो. मुंबईत घर घेण्याचे किंवा एखाद्या मेट्रो शहरात घर घेण्याचे स्वप्न प्रत्येक जण पाहत असतो. यातच पहिल्यांदा घर घेणाऱ्यांची संख्या सध्या मुंबईत मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. गेल्या वर्षांत रिअल इस्टेट क्षेत्राने अनेक चढ-उतार पाहिले. काही तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही महिन्यांपासून घरांच्या किमती स्थिर आहेत, यात फार चढउतार झालेले नाहीत. नवीन बांधकाम तसेच रिसेल घरांनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद अजूनही आहे. अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापकी एक मानला जातो. गुढीपाडव्याप्रमाणेच या मुहूर्तालाही महाराष्ट्रात मोठे महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही विकासकांची आशा उंचावली होती. मात्र मुंबईत ग्राहकांचा प्रतिसाद फार दिसून आला नाही.

ग्राहकांचा प्रतिसाद मुंबईपेक्षा ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या ठिकाणी दिसून आला. गुढीपाडव्याला गुंतवणुकीसाठीदेखील ग्राहकांचा प्रतिसाद काही प्रमाणात पाहायला मिळाला. घरासोबत ग्राहकांच्या भावना जोडलेल्या असतात. नेमका याचाच फायदा घेत प्रत्येक विकासक सणासुदीच्या काळात विविध ऑफर्स देऊन ग्राहकांना भारावून टाकतात. मात्र ग्राहकांनी या ऑफर्सला न भूलता त्यातील छुप्या बाबींची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. मागील वर्षी रेरा लागू झाल्यामुळे ग्राहकांमध्ये काही अंशी विकासकांबाबतचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे पारदर्शक व्यवहार होण्यास मदत होत असल्याने प्रतिसादही उत्तम येईल अशी अपेक्षा आहे. मुहूर्तावरील खरेदी व व्यवहारात आलेली पारदर्शकता या दोन महत्त्वाच्या गोष्टींमुळे रिअल इस्टेट क्षेत्राची यावेळीही प्रगती होईल अशी आशा नरेड्कोचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांना आहे. सामान्यत: सणासुदीच्या काळात घरखरेदीत वाढ होताना दिसते. आकर्षक किमती व रेरामुळे ग्राहकांना आपल्या गुंतवणुकीमुळे आलेला विश्वास याचा फायदा आम्हाला होत असल्याचे पोद्दार हाऊसिंगचे रोहित पोद्दार यांनी सांगितले. रेरा, जीएसटी व नोटाबंदीनंतर रिअल इस्टेट क्षेत्राला उतरती कळा लागल्याचे अंदाज प्रत्येकाने वर्तवले. मात्र मागील ६ महिन्यांत या परिस्थितीत बदल होऊन गृहविक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे असे अजमेरा रिअ‍ॅल्टीचे संस्थापक धवल अजमेरा यांनी म्हटले आहे. घर घेणारा तरुणवर्ग व मध्यमवर्गीय ग्राहक कमी झालेल्या घरांच्या किमतीचा फायदा घेऊ शकतात असेही अजमेरा यांनी नमूद केले आहे.

सोनेखरेदीला देखील या मुहूर्तावर मोठी मागणी असते. मात्र मार्केटची सद्य:स्थिती पाहता सोन्यापेक्षा घरामध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल असा सल्ला हावरे ग्रुपचे अनिकेत हावरे यांनी दिला आहे. नवीन बांधकामाच्या वेळी घरांचं बुकिंग केल्याने ग्राहकांना फायदा होऊ शकतो. तसेच रेडी टू मूव्ह घरांनादेखील ग्राहकांची तितकीच पसंती आहे अशी माहिती निर्मल लाइफस्टाइलचे धम्रेश जैन यांनी दिली आहे. तसेच या सणासुदीच्या काळात ग्राहकांना विविध स्लॅबमध्ये घराची किंमत देण्याची सुविधा असल्याने विक्रीत वाढ होण्याची चिन्हे आहेत, असेही जैन यांनी सांगितले.

भारतात सणासुदीच्या वेळी घर घेण्याला वेगळे महत्त्व असते. त्यामुळे अशा वेळी घरखरेदी करताना कुठेतरी ग्राहक भावनिक होऊन विचार करतो. आणि हेच कित्येकदा नुकसानदायी ठरते. कारण भावनिकदृष्ट्या विचार करत असताना संबंधित ऑफर्सच्या नियम व अटी बहुतेक वेळा लक्षपूर्वक पाहिल्या जात नाहीत. आणि नेमकी हीच चूक ग्राहक करतात. विकासकांच्या या ऑफर्स स्वीकारू नये किंवा त्या खोटय़ा असतात असं नाही, मात्र आपल्याला जसं घर हवं आहे, घरातल्या सर्व व्यक्तींच्या गरजा पूर्ण करणारे ठिकाण या ग्राहकांच्या घर घेण्यामागच्या गरजा पूर्ण होत असतील तर या ऑफर्स स्वीकारण्यात

काहीच हरकत नाही. एकूणच, रिअल इस्टेट क्षेत्रातील उलाढाल पाहता विकासकांना आशा आहे ती सणांकडून, ऑफर्सकडून. परिणामी हळूहळू क्षेत्राची परिस्थिती सुधारेल अशी आशाही विकासकांकडून व्यक्त केली जात आहे.