shrinivas gaisas

  • माझ्या नावे एक भाडय़ाची जागा आहे. ती सन १९८० पासून माझ्या नावावर आहे. पूर्वी ती जागा माझ्या वडिलांनी भाडे तत्त्वावर घेतली होती. माझी आई तिथे २०११ पर्यंत राहात  होती. मी १९८६ पासून उपनगरात राहतो. आता सदर इमारत नवीन मालकाने खरेदी केली आहे. तेव्हापासून म्हणजे सन २००५ पासून तो एकदाच (वर्षांतून) सर्व वर्षांचे भाडे गोळा करतो. त्याने सन २०११ पासून २०१५ पर्यंत भाडेच घेतले नाही, याबाबत मला काय करावे हे समजत नाही.

अनिल कुलकर्णी, मुंबई.

  • आपल्या प्रश्नाचे स्वरूप विस्कळीत असे आहे. सर्वप्रथम आपणाला हे ठरविणे आवश्यक आहे की, सदर जागा आपल्याला ठेवायची आहे की नाही. हे आपणाला ठरवावे लागेल. आपल्याला जर जागेची जरूर नसेल तर व ती पागडीची जागा असेल तर ती विकून टाकणे उत्तम; परंतु आपल्याला सदर जागा टिकवायची असेल तर आपणाला पुढील गोष्टी कराव्या लागतील. आपणाला प्रथम वास्तव्याचा पुरावा तयार करणे आवश्यक आहे. उदा. सदर जागेत रेशन कार्ड ठेवणे, फोन ठेवणे, गॅस ठेवणे, लाइट बिल ठेवणे, लाइट वापरणे, पॅनकार्ड, आधारकार्डसारख्या सर्व गोष्टी त्या पत्त्यावर काढणे, त्या जागी पत्रव्यवहार पाठविणे इत्यादी.

त्याशिवाय मालक भाडे घेत नसेल तर त्याला भाडे घेण्याची लेखी विनंती करणे, तसेच आवश्यक तर भाडे मनीऑर्डरने पाठविणे इ. काळजी घ्यावी लागेल. आपल्या नावावर भाडेपावती असल्याने या गोष्टी करणे आपल्याला अधिक सोयीचे ठरेल.

ghaisas2009@gmail.com