24 April 2019

News Flash

आली माझ्या घरी ही दिवाळी

दिवाळी म्हटलं की आकाशदिवा हवाच. पूर्वी माळ्यावर आकाशकंदिलाचा सांगाडा जपून ठेवलेला असायचा.

सुचित्रा साठे suchitrasathe52@gmail.com

दिवाळी.. वर्षांतला मोठा सण, ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाते, स्वागताची तयारी केली जाते असा सण. ‘हसले मनी चांदणे’ असा सूर लावत कोजागिरीच्या चांदण्यात भेळ आणि मसाला दूध याचा आस्वाद घेतल्यानंतर ठळकपणे तारीखवारांसह मनात डोकावणारा हा सण. दिवाळीच्या दिवसांत कोणत्याही व्यापात अडकण्याची वेळ येऊ नये यासाठी विचारपूर्वक नियोजन करायला लावणारा सण. तांबडं फुटलं की केशरी पिवळ्या रंगाच्या पायघडय़ा घातल्या जातात. त्या पाश्र्वभूमीवर कौतुकाची निरांजन ओवाळून घेत डोंगराआडून ‘तेजोनिधी लोहगोल’ असे सूर्यबिंब वर येते, तशी दिवाळी उत्सवी, सजलेल्या वातावरणात हजर होते. ती येण्यापूर्वीच तिच्या येण्याचे पडघम निनादू लागतात. बाहेरून वेगवेगळ्या स्थूल, व्यक्त स्वरूपात ती घरांत डोकावते हे जरी खरं असलं तरी सूक्ष्म, अव्यक्त रूपाने ती ‘मनांत’ असतेच असते. म्हणूनच काही कारणाने त्या सुमारास आलेल्या बहिणीला कौतुकानं भाऊबीज दिली जाते. ज्या घरांवर दु:खाची छाया आहे तिथे आठवणीने फराळ पाठवायचा आहे, हे गृहीत धरूनच तशी तयारी ‘घरांत’ केली जाते.

खरं तर दिवाळी आली की परिसर आकाशकंदील, साध्या रंगीत पणत्या, लुकलुकणाऱ्या विजेच्या दिव्यांच्या माळा, मिठाईचे बॉक्सेस, कपडय़ांनी भरलेल्या दुकानांच्या शोकेस, रांगोळीचे रंग आणि गर्दीने सजून जातो. तर घरं फराळाच्या पदार्थानी भरून जातात. म्हणजे दरवर्षी तेच तेच असतं, पण काळानुसार, पिढीनुसार त्यात बदल घडून येतात. म्हणजे वरचं रंगीत कागदाचं वेष्टन वेगळं, आतली वस्तू मात्र तीच!

काळाची पाने उलटत अर्धशतक मागे गेलो तर जे दिवाळीचं चित्र दिसायचं, त्यात आता आमूलाग्र बदल झाला आहे.

फराळ म्हणजे फराळाचे जिन्नस घरीच करायचे असतात असा अलिखित नियमच असायचा. त्यामुळे घरांत असलेल्या ज्येष्ठांचा सल्ला घेऊन, मागच्या वर्षीचा अनुभव जमेस धरून पदार्थ बनवले जायचे. सगळ्यांची आवडती चकली प्रत्येक घरांत वेगवेगळ्या चवीत, वेगळ्या रूपात समोर यायची. कुणाची अतिशय खुसखुशीत, कुणाची कुरकुरीत तर कुणाची ‘कडक’ अवतार धारण केलेली तर कुणाची ठसठशीत मीठ तिखटाने चविष्ट झालेली. कशीही असली तरी मोठमोठय़ा पत्र्याच्या डब्यात ती जागा अडवून बसायची. त्यामुळे लहानथोर मनात आलं की चकली तोंडात टाकताना दिसत. घरं संमिश्र गंधानं भरभरून जायची. एका घरात बेसन भाजायला सुरुवात झाली की दुसऱ्या घरातली ‘नाकं’ वास घेण्याच्या कामात बुडून जायची. घरी केलेलं स्वस्त पडतं, भरपूर होतं हे ‘अर्थ’ कारण त्याच्यामागे असे. जी गोष्ट चकलीची तीच इतर जिनसांची. घराघरातून आलागेला, पैपाहुणा, शेजारीपाजारी, शेजाऱ्यांचे पाहुणे यांना फराळाचं निमंत्रण असे. आढेवेढे न घेता तेही ज्येष्ठांच्या आग्रहाचा मान ठेवत असत. ताटांत फराळ ठेवलाय आणि सगळे गोल करून त्यावर ताव मारताहेत, असं चित्र आता कागदावर काढलंही जाणार नाही. फराळाचं वाटपही चाले. प्रत्येक घराची ‘चव’ वेगळी. सुगरणीची अशी जहिरात होत असे. शिवाय पारंपरिक पदार्थ करण्याची परंपरा जपल्याचा आनंद आणि अभिमान मिरवला जात असे. एवढं मात्र खरं की सारखे सारखे ‘हे’ पदार्थ होत नसत. त्यामुळे अप्रूप वाटत असे.

आता दिवस बदलले आहेत. करियरच्या ‘उंच झोक्या’मुळे ‘वेळ’ हातात नाही. साहजिकच फराळाचे पदार्थ तयार होताना बघणं, त्यात लुडबूड करणं, ‘हात’चलाखी दाखवणं या आनंदाला ग्रहण लागलं आहे. चिवडा, लाडू, चकलीची पाव किलो, अर्धा किलोची पाकिटं घरी आणली जातात. परंतु सगळी सर्वसाधारण एकाच ब्रँडची. स्वत: काहीही करायचं म्हटलं की विचार केला जातो, पण तीच गोष्ट सहज उपलब्ध होत असेल तर मनात इच्छा झाली की लगेच आणले जाते. खाल्ले जाते. मग दिवाळी म्हणून त्याचं फारसं महत्त्व वाटत नाही. मग कौतुकानं खाणं तर दूरची गोष्ट. देणंघेणंही आपोआप मागं पडतं. हातावर ठेवायला जावं तर उमलती पिढी तोंड वाकडं करते. त्यांना हवा असतो पिझ्झा, बर्गर, पावभाजी. त्यामुळे फराळाला बोलावणं ही संकल्पनाच हळूहळू नामशेष होत चालली आहे. त्याऐवजी ‘दिवाळी पार्टी’ सुरू झाली आहे.

नरकचतुर्दशीचा फराळ तर घरातून रस्त्यावरच होऊ लागला आहे. बापरे, रस्ता फुलतो म्हणजे काय ते त्यावेळी कळतं. कितीही खड्डे पडले असले तरी रस्ते खऱ्या अर्थाने तरुण होतात. हसणं, खिदळणं, गळ्यात गळे घालून मैत्रीचं फोटोसेशन करणं, असं आनंदाला उधाण येतं. कपडय़ातील वैविध्य लक्षणीयच. ऊन चढू लागले की रस्ते शांत होतात आणि सगळे वातानुकूलित खोलीत निद्राधीन होतात.

चराचर म्हणजे चरणे आणि चारणे संस्कृतीत जसा बदल होत गेला तसा कपडेपटातही झालाय. पूर्वी फक्त तीन चार कपडय़ांचे जोड असायचे. त्यामुळे दिवाळीला नवीन कपडे मिळाले की आनंद अवर्णनीय असे. आजकाल कपडय़ांच्या रूपात, संख्येत आणि प्रकारात भरघोस वाढ झालेली आहे. कपाटांतून कपडे ओघळत असतात. कित्येक दिवसात हवा लागली नाही अशी वस्तुस्थिती असते. एखादा फाटका कपडा ‘नवा’ म्हणून वापरला जातो. आर्थिक सुबत्ता असली तरी कमी कापडातले ‘डिझायनर’ कपडे वापरण्याकडेही कल आहे. पण खरेदीशिवाय दिवाळी नाही आणि मॉल मालामाल झाल्याशिवाय रहात नाही.

दिवाळी म्हणजे पाहुणे हे समीकरण पूर्वी पक्कं होतं. काकू, मावशी, आत्या, मामी कोणी ना कोणी तरी दिवाळीला यायचंच. ‘सह’वास, ‘सह’भाग, ‘सह’योग छान जमून यायचा. नात्यांच्या उत्सवामुळे मंतरलेले दिवस असायचे.

पुढच्या पिढीत सख्खी भावंडं नाहीत. त्यामुळे एकमेकांत अडकलेली नात्यांची वर्तुळं नाहीत. साहजिकच स्वत:तच रमण्याकडे कल झुकू लागला आहे. त्यामुळे घरी कोणी राहायला आलेलं जसं फारसं आवडत नाही, तसं कोणाकडे राहायला जायला फारसं रुचत नाही. दिवाळीनिमित्त कोणाकडे जाण्यायेण्यासाठी वेळ काढणं  हेही स्पर्धेच्या युगात कठीण झालंय. शिवाय सुट्टीच्या तारखा एकमेकांना वाकुल्या दाखवत असतातच. मग सर्वानुमते कुठलं तरी डेस्टिनेशन ठरवून तिथेच एकत्र दिवाळी साजरी करण्याची कल्पना उचलून धरली जाऊ लागली आहे. पायांना चाकं लागलेलीच असतात. धाडधाड सगळे जमतात. अंगतपंगत होण्याऐवजी इच्छाभोजन म्हणजे इच्छा असेल तिथे मांडीवर ताट नव्हे प्लेट घेऊन केलेलं भोजन, हवं ते स्वेच्छाभोजन, खुसखुशीत गप्पा, मधूनच जरा ‘गेमचं’ खेळणं, छोटय़ामोठय़ांचे विविध कलागुण दर्शन होतं. जे ‘घरी’ व्हायचं ते ‘दारी’ होतं इतकंच. पण काळानुसार बदल करत जाणं हेही महत्त्वाचं.

दिवाळी म्हटलं की आकाशदिवा हवाच. पूर्वी माळ्यावर आकाशकंदिलाचा सांगाडा जपून ठेवलेला असायचा. त्याला रंगीत कागद चिकटवून वरच्या बाजूला करंज्या आणि खाली झिरमिळ्या चिकटवण्याचा एक सोहळाच असायचा. अर्थात त्यात होणारा वेळेचा अपव्यय, आता कसा परवडणार, हे बरोबरच आहे.

प्रत्येक घरासमोर दिसणारी मान मोडून काढलेली ठिपक्यांची रांगोळी आता सार्वजनिक चौकात वेगळ्या रूपात रंगू लागली आहे. दोन बोटांच्या चिमटीतून पडण्याऐवजी पाच बोटांच्या सहयोगाने ती आकारास येऊ लागली आहे. रेडीमेड किल्ला ही कल्पना मात्र अजून प्रत्यक्षात उतरलेली नाही. त्यामुळे मनसोक्त मातीत खेळण्याची हौस भागविण्याची हवी तेवढी संधी आहे. एकेकाळी पोस्टकार्डवर चित्र काढून भेटकार्ड तयार करण्याची अनोखी प्रथा होती. शुभचिंतनाबरोबर ख्यालीखुशालीही आवर्जून विचारली जत असे. या ‘हळव्या’ भेटकार्डानंतर ‘तयार’ शुभसंदेश लिहिलेली छापील भेटकार्डे पाठवली जाऊ लागली. आता तर मोबाइलमुळे ‘सर्वासाठी’ एकाच क्लिकवर शुभेच्छा पाठवल्या जातात. खरं तर दिवाळी म्हटलं की फराळ, नवीन कपडे, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, सगळं थोडय़ाफार फरकाने दरवर्षी तेच तेच असतं. तरीही आपण ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा’ असं म्हणतो. कारण आपण मनाने तसं ठरवलेलं असतं की आज दिवाळी आहे, आनंदाचा दिवस आहे. वास्तविक सकाळी उजाडल्यापासून संध्याकाळी मावळेपर्यंत दिवसामध्ये काहीच फरक नसतो. फरक असतो आपल्या ‘मनात’ जे- आपल्या हातात असते. म्हणूनच घरातील अवकाशात दु:खाचे ढग जमलेले असतानाही पहिला पाडवा म्हणून घरी आलेल्या लक्ष्मीला चांदीचं ताट, रांगोळी काढून, शास्त्र म्हणून खीरपुरण करून जेवायला बसवतो. कारण ही आनंदाची ‘दिवाळी’ आहे. दरवर्षी या आनंदाची पुनरावृत्ती व्हावी म्हणून गुणगुणत राहतो की, ‘आली माझ्या ‘घरी’ ही दिवाळी.’

 

First Published on November 3, 2018 1:07 am

Web Title: diwali festival of lights diwali celebrations at my home
टॅग Diwali 2018