News Flash

देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे

कलाकार मस्त कलंदर असतात त्यांना काळवेळाचे भान नसते वगैरे कल्पनांना हे जोडपे पूर्ण अपवाद ठरते.

अलकनंदा पाध्ये

श्रावण महिन्यापासूनच सणांची रेलचेल सुरू होते आणि भाद्रपदातील गणेशचतुर्थी हा कळसाध्याय ठरतो. संपूर्ण परिसर ‘गणपतीबाप्पा मोरया’च्या गजराने दुमदुमून जातो. घरगुती आणि सार्वजनिक ठिकाणीच्या अत्यंत मनमोहक स्वरूपातील गणेशमूर्तीप्रमाणेच त्यांच्यासाठी खास सजावट करणे हेसुद्धा सिद्धहस्त कलाकारांसाठी एक आव्हान असते. अशाच एका ऐरोलीस्थित मनस्वी कलाकार जोडप्याच्या- स्वप्नजा आणि शेखर आहेरच्या घरी गणेशदर्शन आणि त्याहूनही खास म्हणजे अत्यंत कल्पकतेने केलेली सुंदर सजावट पाहणे म्हणजे खराखुरा आनंदानुभव असतो.

गणपती हे आहेर कुटुंबाचे आराध्य दैवत असल्याने गणेशोत्सव हा त्यांचा सर्वात लाडका सण. त्यामुळे  गणरायाच्या आगमनाचे वेध त्यांना ३-४ महिने आधीपासूनच लागलेले असतात. शेखरच्या म्हणण्यानुसार, गेली ३० वर्षे म्हणजे तो विद्यार्थीदशेपासून त्यांच्या घरी गणपतीची स्थापना होऊ लागली. त्या शाळकरी वयातही गणपतीबाप्पांसाठी चांगल्यात चांगली सजावट कशा तऱ्हेने करता येईल यासाठी त्याची आणि त्याच्या धाकटय़ा भावाची धडपड असे. त्याकाळी थर्माकोलचे युग नुकतेच उदयास येत होते .. नावीन्याच्या हौसेपायी तेव्हा त्याने थर्माकोलची सजावट करायला सुरुवात केली. अर्थात ते सर्व छोटय़ा प्रमाणावर असायचे. परंतु त्याचेही आजूबाजूच्यांकडून तोंडभर कौतुक व्हायचेच. पुढे स्वप्नजासारखी कलाकार आयुष्याची जोडीदार म्हणून लाभल्यावर तर सजावटीसाठीच्या कल्पनांना चहुबाजूनी धुमारे फुटू लागले.

ऐरोलीला स्वत:च्या घराचे स्वप्न साकार झाल्यावर सर्वप्रथम दोघांनी विचार केला गणेशोत्सवातील गणपती बाप्पाच्या स्थानाचा. त्यासाठी बठकीच्या खोलीतील एक भिंत निश्चित केली आणि त्यानुसार ती भिंत मोकळी ठेवून आजूबाजूने फर्निचरची मांडणी केली. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्याकडे थर्माकोलचा वापर करूनच सुंदर

सजावट केली जाई .. थर्माकोलचा वापर करून केलेल्या एकाहून एक सुंदर आणि भव्य कलाकृतींना अनेक पारितोषिकेही मिळालेली आहेत. हातात दिवा घेऊन उभी असलेली सुंदरी, जयपूरच्या राजवाडय़ाची प्रतिकृतीसारख्या उत्तमोत्तम आणि भव्य कलाकृती या जोडप्याने आपल्या घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी साकारल्या. त्या घडी करता येण्यासारख्या असल्याने त्यातल्या काही सुंदर कलाकृती तर त्यांच्या काही मित्रमंडळींनी पुढच्या वर्षीच्या स्वत:च्या घरातील सजावटीसाठी मागून घेतल्या. मात्र विसर्जनानंतर थर्माकोलची विल्हेवाट लावणे फार जिकिरीचे वाटे त्याच वेळी दर्शनासाठी येणाऱ्या काही मंडळींनी त्यांना पर्यावरणस्नेही सजावट करण्यास सुचवल्यावर दोघांनीही त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. ठरले.. पुढच्या वर्षांपासून पर्यावरणपूरक अशी देखणी सजावट करण्याचा दोघांनी निश्चय केला. जातिवंत कलाकाराला अशी नवनवीन आव्हाने पेलायला न आवडले तरच नवल. जे त्यांनी सहजपणे स्वीकारले. पहिल्याच वर्षी त्यांनी साक्षात वडाच्या झाडातील ढोलीत गणपतीबाप्पाची स्थापना करायचे ठरवले. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी उदा. जुनी वर्तमानपत्रे, कार्डबोर्ड, सुतळ्या, सुंभ, रंग, गोंद वगैरेनी तयार केलेले झाड नैसर्गिक वाटावे यासाठी शेखर रोज घराजवळच्या वडाची थोडी पाने काढून चिकटवत असे. पारंब्यासुद्धा खऱ्या झाडाच्या तोडून लावल्या होत्या. त्या सजावटीला लोकसत्ताचे घरगुती सजावटीचे बक्षीसही मिळाले होते. गायीच्या पोटात ३३ कोटी देव वास करतात ही कल्पना उचलून एका वर्षी त्यांनी रद्दी आणि पुठ्ठय़ाच्या साहाय्याने गायीत बाप्पाची स्थापना केली होती. बाहेरून आत येणाऱ्या व्यक्तीची क्षणभरासाठी फसगत होई इतकी हुबेहूब गाय साकारली होती. गौरी विसर्जनाच्या दिवशी त्यांच्या बाप्पांच्या विसर्जनानंतर  शेजाऱ्यांच्या आग्रहामुळे त्यांनी एरवीसारखे सजावटीचे विसर्जन केले नाही आणि जवळपास ६ महिने तरी ती गाय त्या मजल्यावरील ४ बिऱ्हाडांच्या मधल्या पॅसेजमध्ये वास्तव्याला राहिली.

कलाकार मस्त कलंदर असतात त्यांना काळवेळाचे भान नसते वगैरे कल्पनांना हे जोडपे पूर्ण अपवाद ठरते. त्यांची मॅनेजमेंटची पदवी नसली तरी त्यांना मॅनेजमेंट गुरू म्हणायला हरकत नाही इतके त्यांचे नियोजन चोख असते. गेली सुमारे ३०वर्षे त्यांच्याकडे एकाही सजावटीची पुनरावृत्ती झालेली नाही. २-३ महिने आधीपासूनच आपसात चर्चा करून एखादी संकल्पना नक्की करतात. त्यानुसारच त्यावर्षीची शाडूची मूर्ती कशी आणावी ते ठरवले जाते. संकल्पनेनुसार बरीचशी स्केचेस काढतात त्यानंतर लागणाऱ्या साहित्याची उदा. रद्दी पेपर, सुतळ्या, कार्डबोर्ड, रंग, गोंद वगैरेची यादी तयार करतात. तसेच विजेच्या दिव्यांची रचना कुठून आणि कशी करावी याचाही पूर्ण आराखडा तयार केला जातो. त्यानंतर  गणपतीच्या तयारीसाठी वेळापत्रकच बनवले जाते. त्यात सजावटीचे काम किती दिवसात पूर्ण व्हावे इथपासून ते उत्सवासाठीची खरेदी ५-७ दिवसांचा जेवणाचा.. प्रसादाचा मेनू घराची रंगरंगोटी (हो.. गणपतीपूर्वी घराची फक्त साफसफाई नाहीतर दरवर्षी रंग लावला जातो) गणपतीबाप्पाच्या आगमनाचा आनंदसोहळा साजरा करताना संपूर्ण घरातील वातावरणही तितकेच प्रसन्न राहील यावर त्यांचा कटाक्ष असतो.

आजकाल फ्लॅट संस्कृतीमुळे शेजारधर्म दुर्मीळ होतोय असे म्हटले जाते; परंतु या जोडप्याचा मित्रपरिवार खूप मोठा असल्याने दिवसभराचे उद्योग-व्यवसाय सांभाळून हे दोघे जेव्हा रात्री सजावटीच्या कामाला लागतात तेव्हा स्वत:च्या घरचा गणपती समजून शेजारपाजारची मित्रमंडळीसुद्धा त्यांच्या मदतीसाठी येतात. सार्वजनिक गणेशोत्सवासारखेच रात्री उशिरापर्यंत गप्पा आणि हास्यविनोदात त्यांच्या सजावटीचे काम चालू असते. शेखर स्वप्नाची मुलगी साक्षी तिचा पिंडही कलाकाराचाच फक्त चित्रकलेऐवजी ती छायचित्रणकलेत स्वत:चा विशेष ठसा उमटवू लागली आहे. घरातील दरवर्षीच्या सजावटीचे विशेष म्हणजे त्याच्या पूर्वतयारीचे असंख्य फोटो काढून तिने त्याचा संग्रह करून ठेवला आहे. ज्याचा उपयोग आपसूकच स्पर्धेतील परीक्षकांना दाखवण्यासाठी होत आलाय.

उत्सवाच्या ५-७ दिवसांत आहेरांचे घर मंद संगीताच्या साथीने सुवासिक धुपाच्या दरवळाने आणि दर्शनासाठी येणाऱ्या असंख्य पाहुण्यांच्या वर्दळीने भरून गेलेले असते. पूजेअच्रेची जबाबदारी शेखरच्या आईबाबांनी घेतलेली आहे. प्रत्येकाचे स्वागत सुहास्य मुद्रेने आणि सुग्रास प्रसादाने व्हायला हवे याबाबतीत पूर्ण आहेर कुटुंबीय सतत दक्ष असतात. त्यांच्या सजावटीचा सर्वदूर बोलबोला झाल्यामुळे बरेचजण कुतूहलापोटी ओळख काढूनही दर्शनाला येतात आणि पुढच्या वर्षीपासून ते त्यांचे हक्काचे पाहुणे झालेले असतात. मित्रपरिवारालासुद्धा यांच्या गणपतीचे कौतुक असल्याने सर्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच ते आपसात गट करून आरतीचे दिवस परस्पर ठरवून मोकळे होत आपला दिवस जाहीर करतात. त्यामुळे रोज आरत्यांचा कार्यक्रमही तालासुरात रंगतो. शेखरच्या मते, गौरीविसर्जनाच्या दिवशी बाप्पांचे विसर्जन केल्यावर रिकाम्या मखराकडे बघणे अशक्य होऊन जाते. गेले कित्येक महिने झटून केलेली ती सुंदर सजावट बाप्पांविना निष्प्रभ वाटण्याचा अनुभव मात्र फारच क्लेशकारक असतो. त्यातून सावरल्यावर काही महिन्यांतच पुनश्च हरी ओम्प्रमाणे या कलाकार जोडप्याला वेध लागतात नवनिर्मितीचे..बाप्पासाठी पुढच्या वर्षीच्या सजावटीचे.

alaknanda263@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 12:57 am

Web Title: ganpati decoration ganesh chaturthi decoration ideas
Next Stories
1 एकटय़ादुकटय़ा वृद्धांची सुरक्षा
2 दुर्गविधानम् : ..ते हे राज्य!
3 घर बदलत्या काळाचे : घरचा भाजीपाला..
Just Now!
X