News Flash

कायद्याच्या चौकटीत : घटस्फोट आणि मालमत्ता

कायद्याप्रमाणे हिंदू अविभक्त कुटुंबातील मिळकतीवर सर्व सदस्यांचा समान आणि सामाईक हक्क प्रस्थापित झालेला असतो.

Mapple Group

vastuविभक्त आणि अविभक्त कुटुंबाचे फायदे-तोटे आपण सर्वानी शाळेत असताना अभ्यासले आहेत. पण काही वर्षांनी घरासंबंधात यातील बरीच अनुमाने बदलली असल्याचे आपल्या लक्षात येते. करसल्लागाराच्या सल्ल्याने अनेक जण कर सवलतींचा फायदा मिळवण्यासाठी हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून आपली कायदेशीर ओळख प्रस्थापित करतात. यात प्रत्येकाच्या वाटय़ाला करसवलत येत असल्याने एकत्र कुटुंबाला घसघशीत वजावट मिळते. त्याच छत्राखाली सगळे व्यवहार होत असल्याने साहजिकच घर किंवा इतर स्थावर मालमत्तेची खरेदीही हिंदू अविभक्त कुटुंबाच्या नावे करण्यात येते. पण सगळे दिवस सारखे नसतात. कालांतराने कुटुंबातल्या काही सदस्यांनी वेगळे व्हायचे मनात आणल्यास स्थावर मिळकतीबाबत पेच आणि प्रसंग कलह निर्माण होतात.

कायद्याप्रमाणे हिंदू अविभक्त कुटुंबातील मिळकतीवर सर्व सदस्यांचा समान आणि सामाईक हक्क प्रस्थापित झालेला असतो. वेगळे व्हायचे झाल्यास दागदागिने, रोख रकमा, गाडय़ा किंवा इतर चल संपत्तीची वाटणी एका बैठकीत करता येणे शक्य आहे. मात्र जमीनजुमला, घरे, व्यावसायिक जागा, अशा अचल संपत्तीची वाटणी सहजतेने करता येणे शक्य होत नाही. अशा वेळी बरीच भवती न भवती होऊन काही पर्याय काढावे लागतात. यातला पहिला पर्याय अर्थातच वेगळे होऊ इच्छिणाऱ्याला त्याचा वाटा रोख स्वरूपात देणे हा असतो. मात्र मोक्यावरच्या जागांवरील आपला हक्क किंवा आपला वाटा सोडण्याची कोणाचीही इच्छा नसते. अशा वेळी या वादावर समाधानकारक तोडगा निघणे दुरापास्त होते. मग नाइलाजास्तव ती जागा विकून येणारे पैसे वाटून घेण्याचाच पर्याय शिल्लक राहतो. हेही आपापसात सामोपचाराने जमले तर ठीक, हेही नाही जमले तर मात्र या वादापायी न्यायालयात जाण्याशिवाय गत्यंतर उरत नाही.

हे सगळे होते कारण हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून करसवलतीसाठी नोंदणी केल्यावर त्या संकल्पनेनुसारच इतर सर्व कायदेशीर बाबी आपोआप लागू होतात. हिंदू अविभक्त कुटुंबात एक कर्ता असतो आणि बाकी सारे सदस्य असतात. कर्ता हा कुटुंबप्रमुख मानला गेलेला असला तरी त्याच्या कायदेशीर अधिकारांवरदेखील बऱ्याच मर्यादा आहेत. स्थावर मालमत्तांची नोंदणी त्याच्या नावे असली तरी त्या मालमत्तांमध्ये सर्वाचा समान अधिकार असतो. कायद्याचा काटेकोर विचार करता त्या कुटुंबातील अपत्येही केवळ जन्मानेच संपत्तीत सह-हिस्सेदार आणि वारसदार बनतात. अशा सह-हिस्सेदारांची आणि वारसदारांची संख्या जशी वाढत जाते तशी प्रकरणे अधिकाधिक गुंतागुंतीची बनत जातात.

अशा वेळेस वाद निर्माण झाल्यास आणि सामोपचाराचे प्रयत्न निष्फळ झाल्यास, न्यायालयात जावे लागते. न्यायालयात गेल्यावरदेखील मध्यस्थीने किंवा आपसात समझोता करून वाद निकाली काढण्याची सोय असते. हल्ली तरी त्याकरता खास करून विशेष लोक-अदालती भरविण्यात येत आहेत.

मात्र सामोपचाराचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरल्यास निर्माण होणाऱ्या अनंत कटकटींना सामोरे जाण्याशिवाय काहीही गत्यंतर उरत नाही. हे झाले केवळ कुटुंबात जन्मलेल्या सदस्यांचे. मात्र कुटुंबातील सदस्यांची लग्नेही होतातच. दुर्दैवाने अशी लग्ने यशस्वी न होता काडीमोड घेण्याचा कटू प्रसंग उद्भल्यास परत मालमत्ता आणि त्यातील पत्नीचा हक्क किंवा पोटगी मिळण्याचा हक्क असे पेच उभे राहतात. हा पती-पत्नीमधला वाद सामंजस्याने न सुटल्यास त्याचे दूरगामी परिणाम अविभक्त कुटुंब आणि त्याच्या मालमत्तेवर होण्याची दाट शक्यता निर्माण होते.

काही वेळेस असेही होते की, हिंदूू अविभक्त कुटुंबाची मिळकत गहाण पडलेली असते. किंवा अशा मिळकतीवर कोणत्यातरी कर्जाचा बोजा असतो. अशा परिस्थितीत एखाद्या सदस्याला वेगळे व्हायचे झाल्यास किचकट कायदेशीर पेचांना सामोरे जावे लागते. वेगळे होणाऱ्याला हिस्सा हवा असतो, तर कर्ज देणाऱ्याला त्याची रक्कम आणि व्याज याव्यतिरिक्त कुटुंबातील अंतर्गत बाबींमध्ये अजिबात स्वारस्य नसते. अशा वेळेस कुटुंबातील सगळे सदस्य काय भूमिका घेतात यावरच सारे काही अवलंबून असते. सर्व सदस्यांनी सामोपचाराने सर्वाना मान्य होणारा तोडगा काढला तर ठीक, अन्यथा अशा वादांचे भिजत घोंगडे तसेच राहाते.

या सगळ्या सांगण्याचा मतीतार्थ इतकाच की कोणतेही वहान जसे एकहाती असलेले उत्तम असते, तशाच शक्यतोवर मालमत्तादेखील एकहाती म्हणजेच एकेकाच्या स्वतंत्र मालकीच्या असणे श्रेयस्कर असते. तत्कालिक करसवलतीकडे बघून थोडय़ाशा फायद्याकरता भविष्यात उद्भवू शकणाऱ्या दीर्घकालीन गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करायचे म्हणजे पेनी वाइज आणि पाउंड फूलिश नाही तर दुसरे काय?

tanmayketkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2016 1:05 am

Web Title: laws of divorce and property
टॅग : Property
Next Stories
1 जुनं घर सोडताना..
2 वास्तु-मार्गदर्शन
3 अहमदाबादचा वास्तुवैभव वारसा
Just Now!
X