रंगचक्रावरचे पहिले दोन प्राथमिक रंग म्हणजे तांबडा आणि पिवळा, हे आपण गेल्या दोन भागांमध्ये पाहिले. पण या दोन रंगांच्यामध्ये द्वितीय रंग असलेला नारिगी रंग हा केवळ रंगचक्रावरच नसतो, तर तो इंद्रधनुष्यातही तांबडय़ा आणि पिवळ्या रंगाच्यामध्ये केसांत फूल माळावं तसा तो खोवलेला असतो. नारिगी रंग हा अर्थातच तजेलदार तांबडय़ा आणि प्रसन्न पिवळ्या रंगाच्या मिश्रणातून तयार झालेला असतो. मनाला तजेलदारपणा आणि प्रसन्नपणा असेल तर मन अर्थातच आनंदी असतं. आणि म्हणूनच नारिगी रंग हासुद्धा आनंदीपणाचं प्रतीक आहे. नारिगी रंग हा जसा आनंदाचं प्रतीक आहे, तसाच तो उत्साह, चेतना आणि सामाजिकतेचंही द्योतक आहे. फळबाजारात गेल्यावर सर्व फळांमध्ये माल्टा किंवा नारिगी हे फळ आपलं विशेष लक्ष वेधून घेतं. नारिगी रंग हा सर्जनशीलता आणि निर्मितीशीही जोडला गेला आहे, असं मानलं जातं. कृष्ण यजुर्वेदाशी संबंधित असलेल्या ३२ उपनिषदांपकी एक आणि २० योग-उपनिषदांमधलं एक असलेल्या योग-कुंडलिनी उपनिषदामध्ये आणि आयुर्वेदानुसार मणक्याचे म्हणजे सुषुम्नाचे पाच भाग दिले असून, माणसाचं आरोग्य नियंत्रित करणाऱ्या षट्चक्रांपकी पाच चक्र याच पाच भागांमध्ये असतात. यातल्या मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत आणि विशुद्ध या चक्रांपकी जननेंद्रियांशी आणि निर्मितीशी संबंधित असलेल्या स्वाधिष्ठान चक्राशी इंद्रधनुष्यातल्या नारिगी रंगाचा संबंध असल्याचं मानलं जातं. कारण वर उल्लेखल्याप्रमाणे नारिगी रंग हा निर्मितीशी संबंधित मानला गेला आहे. विश्वातल्या सर्व सचेतन वस्तू या ऊर्जा उत्सर्जति करत असतात आणि प्रकाश हे ऊर्जेचं रूप आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे देवादिकांच्या छायाचित्रांमध्ये त्यांच्यामागे प्रकाशाचं म्हणजेच त्यांच्यापासून उत्सर्जति होणाऱ्या ऊर्जेचं वलय दाखवलं जातं, तसंच प्रत्येक माणसाच्या शरीरातूनही प्रकाशाच्या स्वरूपात ऊर्जा उत्सर्जति होत असते, असं मानलं जातं. मात्र, हे ऊर्जा किंवा प्रकाश उत्सर्जनाचं प्रमाण बऱ्याच जणांच्या बाबतीत दिसण्यात येत नाही, तर अगदी काहींच्या बाबतीत ते दिसून येतं. सदैव प्रसन्न, आनंदी आणि शांत स्वभावाच्या असलेल्या माणसांकडे पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला एक प्रकारचं जे तेज जाणवतं, ते तेच असतं. माणसांकडून उत्सर्जति होणाऱ्या अशा तेजाशी, रंगचक्रावरच्या संबंधित रंगांनुसार माणसांचे स्वभाव सांगितले जातात. यानुसार नारिगी रंगछटेजवळचा रंग जर या तेजाशी संबंधित असेल, तर अशा माणसांमध्ये चतन्य अधिक असल्यामुळे त्यांना खेळांची आवड असते आणि अशी माणसं ही अधिक वेगाने हालचाली करणारी किंवा चपळ असू शकतात.

ही सगळी पाश्र्वभूमी जाणून घेतल्यानंतर आता आपण मूळ विषयाकडे वळू या. घराचं इंटिरिअर करताना नारिगी रंगाचा कुठे व कसा वापर होऊ शकतो, ते आता आपण पाहू या. नारिगी रंग सामाजिकतेचं प्रतीक मानला गेला आहे, तो एकत्र नांदणाऱ्या समुदायाशी निगडित आहे. कारण मुळात तो आनंद व्यक्त करतो आणि म्हणूनच घरात होणाऱ्या वाढदिवसासारख्या छोटेखानी समारंभांना किंवा इतर वेळी जिथे लोकं एकत्र जमतात, पाहुणे येतात, अशा बठकीच्या खोलीतली फिचर वॉल म्हणजे, नजरेत येईल अशी खोलीतली एखादी भिंत नारिगी रंगात रंगवावी. शाळा-महाविद्यालयांमधल्या वर्गातल्या एक किंवा समोरासमोरच्या दोन भिंती नारिगी रंगात रंगवल्या तर मुलांचा शिकण्यातला उत्साह, जिज्ञासा वाढून शिक्षण अधिक आनंददायी होऊ शकतं. मात्र, नारिगी रंग हा एकदम डोळ्यात भरणारा, डोळे प्रदीप्त करणारा फ्लुरोसण्ट रंग असल्यामुळे त्यामुळे येणारा भडकपणा कमी करण्याकरता उरलेल्या भिंती लाइट क्रीम किंवा बफ यांसारख्या पेस्टल रंगांमध्ये रंगवाव्यात. अथवा किमान सोफ्याची आणि खुच्र्याची कव्हर्स तरी अशा संतुलन साधणाऱ्या रंगांची असावीत. छायाचित्र १ मध्ये नारिगी रंगाचा वापर करून भिंती रंगवलेल्या दोन लििव्हगरूम्स दाखवल्या आहेत. नारिगी आणि काळपट चॉकलेटी ही रंगजोडी वाघाच्या अंगावर उठून दिसते. त्यामुळे त्याचा वापर छायाचित्र १ मधल्या डावीकडच्या चित्रात कारपेटसाठी, तर उजवीकडच्या चित्रात टीपॉयच्या टिंटेड काचेसाठी केला आहे. त्यामुळे भिंतीवरच्या नारिगी रंगाला उठाव आला आहे. डायिनगरूममध्ये जिथे किमान रात्री तरी सर्व कुटुंब जेवणाकरता एकत्र येते, अशा ठिकाणीही वर सांगितल्याप्रमाणे रंगांचं योग्य संतुलन साधलं गेलं, तर नारिगी रंगाचा वापर काही भिंतींसाठी करायला हरकत नाही. अशीच एक डायिनग रूम छायाचित्र २ मध्ये दाखवली आहे. त्यातलं टेबल क्लॉथही पांढऱ्या रंगातलं आहे. बेडरूमचा रििडग रूम म्हणून वापर करायचा असेल, तेव्हाही बेडमागची भिंत नारिगी रंगात रंगवली, तर दोन्ही बाजूच्या टेबल लॅम्पसचा प्रकाश मागच्या नारिगी भिंतीवर पडून खोली उजळून निघालेली दिसते. त्यामुळे वाचनाचा आनंद मनाला अधिक चांगला मिळू शकतो. पण ही भिंत झोपल्यानंतर डोक्यामागेच राहील आणि त्यावरून परावर्तित होणारा प्रकाश हा डोळ्यांवर येणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक आहे, नाही तर झोप शांत लागणार नाही. इथेही चादरीचा पांढरा रंग भिंतीवरच्या नारिगी रंगाला उठाव देतो आहे. असा प्रकाश दिवसा अधिक परावर्तित होतो, तर रात्री खोलीतले दिवे मालवले, तरीही बाहेरच्या कुठल्या तरी दिव्याचा प्रकाश खोलीतल्या भिंतींवर पडतच असतो. म्हणूनच आपल्याला डोळे मिटल्यानंतरही समोर असलेली भिंत कोणत्या रंगात रंगवली आहे, त्यानुसार कमी अधिक प्रकाश हा बंद डोळ्यांसमोर जाणवतो.

शेवटी मन आनंदी तर सर्व काही आनंदी, असं वाक्य आपण कुठल्याशा जाहिरातीत ऐकतोच. तर असा हा आनंद देणारा नारिगी रंग त्याच्याबरोबरच्या संतुलन साधणाऱ्या रंगांबरोबर सुयोग्य रीतीने वापरला, तर घरातलं, शाळा महाविद्यालयांमधलं किंवा ऑफिसातलंही वातावरण आनंदी राहायला मदत होऊ शकेल.

(इंटिरियर डिझायनर)

anaokarm@yahoo.co.in